रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे; रघुनाथदादा पाटलांची घणाघाती टीका

0 झुंजार झेप न्युज

 

रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे; रघुनाथदादा पाटलांची घणाघाती टीका


पुणे : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. “रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही”, अशी घाणाघाती टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ते बोलत होते.


शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेने 28 नोव्हेंबरपासून ‘जनप्रबोधन यात्रा’ सुरु केली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही जनप्रबोधन यात्रा पुणे जिल्ह्यात पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे सध्या यात्रा आलेली आहे. यावेळी पाटील यांना रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता पाटील यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली.


रघुनाथदादा पाटील म्हणाले की, “दानवे कधी शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात, तर कधी वेगवेगळी वक्तव्ये करतात. हा माणूस जोड्याने मारायच्या लायकीचा आहे. त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. भारतीय जनता पक्ष बुडवण्यास रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जबाबदार आहेत”.


पाटील म्हणाले की, “पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठी दानवे अशा प्रकारची वक्तव्ये करतात. परंतु अशा प्रकारचं वक्तव्य करणं पक्षाच्या फायद्याचे आहे की तोट्याचे, याचा विचार ते कधीच करत नाहीत. परंतु पक्षाचे अध्यक्ष अशा नेत्यांना पक्षात ठेवतात. पक्षात मोठी पदं देतात. त्यांना केंद्रीय मंत्रीपदं दिली जातात. पक्षाने आता अशा लोकांबाबत विचार करुन निर्णय घ्यायला हवा. अशा वाचाळवीरांनी आतापर्यंत अनेक पक्षसंघटना बुडवल्या आहेत”.


दानवे काय म्हणाले होते?


राजधानी दिल्लीत गेल्या 13 दिवसांपासून पंजाब, हरयाणातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. देशातील इतर राजकीय पक्ष व शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकीकडे हे आंदोलन तीव्र होत असतानाच दुसरीकडे भाजपचे नेते या आंदोलनावर टीका करताना दिसत आहे. रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे.


‘हे शेतकऱ्यांचं आंदोलन नसून या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. पहिल्यांदाच देशातील मुस्लिम समाजाला भरकटवलं आणि सीएए आणि एनसीआरमुळं मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल, असं सांगितलं. पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?’ असा सवाल दानवेंनी यावेळा केला.


रावसाहेब दानवेंनी पोलिसांना पुरावे द्यावे : सतेज पाटील


शेतकरी आंदोलनाबाबत रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून त्यांच्याकडे याबाबबतचे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना द्यावेत आणि आपल्या वक्तव्यावर ठाम राहावे, असा खोचक सल्ला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. सतेज पाटील म्हणाले की, “रावसाहेब दानवे हे एक ज्येष्ठ राजकीय नेते आहेत, त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणं चुकीचे आहे. शेतकऱ्यांबद्दल सर्व देशभरात सहानुभूतीचे वातावरण आहे, असे असताना दानवे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य कोणत्या पुराव्याच्या आधारे केलं हे त्यांनी स्पष्ट करावं. जर त्यांच्याकडे असे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत आणि स्वतःच्या वक्तव्यावर ठाम राहावं”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.