पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ३० लाख नागरिकांना मोफत कोरोना लस…

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ३० लाख नागरिकांना मोफत कोरोना लस…

 

पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ३० लाख नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध मिळावी. त्यासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांची तरतूद महापालिका अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. याबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची शुक्रवारी आमदार लांडगे यांनी भेट घेतली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्तांकडे सादर केले आहे.

निवेदनात आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका ही आशिया खंडातील सर्वाधिक विकसीनशील महापालिका आहे. शहराचा नावलौकिक आणि विकासामध्ये शहरातील प्रत्येक नागरिकांचे योगदान आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि सुरक्षा देणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वस्तरातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत आणि प्राधान्यक्रमाने मिळाली पाहिजे. यासंदर्भात महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, संबंधित विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांची तात्काळ बैठक आयोजित करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर जगभरात सहा ते सात ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसचे उत्पादन सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकार लसीकरणाबाबत त्या-त्या त्या स्तरावर नियोजन करीत आहे. मात्र, शहरातील लोकप्रतिनिधी या नात्याने केंद्र आणि राज्य सरकारवरच्या धर्तीवर महापालिका स्तरावर मोफत लसीकरणाबाबत आग्रही आहोत. कारण, केंद्र अथवा राज्य सरकारच्या नियोजनाप्रमाणे कदाचित शहरातील नागरिकांना उशीरा प्राधान्यक्रम मिळू शकतो. त्यामुळे पुणे, हैद्राबाद, रशिया, इटलीसह अन्य उत्पादन करणाऱ्या जगभरातील कंपन्यांशी समन्वय साधून तात्काळ लस उपलब्ध करण्याबाबत तातडीचे निर्णय घेण्यात यावेत.

शहराची लोकसंख्या सुमारे २७ ते ३० लाखांच्या घरात आहे. त्यादृष्टीने लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन मनपा स्तरावर करावे लागणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्याकरिता तसेच नागरिकांचे आरोग्याचे हित लक्षात घेता आगामी अर्थसंकल्पामध्ये (२०२१-२२) तरतूद करून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये प्रभागस्तरावर मोफत लस उपलब्ध करून देण्यात यावी.

‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ तयार करावा…

शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था-संघटनांचे प्रतिनिधी यांना विश्वासात घेवून मोफत लसीकरणाबाबत ‘कॉमन मिनिमन प्रोग्राम’ तयार करावा. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शहराची लोकसंख्या आणि लसीची अंदाजे किंमत याचा विचार करता सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यासंदर्भात आवश्यक तरतूद आणि यंत्रणा आतापासून उभी करावी. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लस उपलब्धता, प्रभागस्तरावर वितरण याबाबत नियोजन करावे. जगभरातील लस उत्पादक कंपन्यांनी समन्वय करुन २७ ते ३० लाख लसची बुकिंग करावी. तसेच, कोरोना योद्धा, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, लहान मुले तसेच वय आणि आजारानुसार लसीकरण अशा प्राधान्यक्रमाने लसीकरण मोहीमेचे नियोजन करावे. या मोहीमेबाबत प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.