खबरदार! खराब रस्ते बनवाल तर होईल कठोर शिक्षा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा
भारतात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये जवळपास दीड लाख लोक मरण पावतात. तर, सुमारे 3 लाख लोक अपंग होतात.
मुंबई : जागतिक रस्ते अपघातांबद्दल माहिती घेतली तर, त्यातील सुमारे 11 टक्के अपघात हे भारतातील आहेत. मात्र, काही ठोस प्रयत्नांमुळे सध्या रस्ते अपघातांची संख्या कमी झाली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंगळवारी सांगितले. जागतिक बँकद्वारे आयोजित एका रस्ता सुरक्षा कार्यक्रमाला व्हर्चुअली संबोधित करताना रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री गडकरी यांनी म्हणाले की, रस्ते अपघातांमुळे देशाच्या जीडीपीला 3.14 टक्के तोटा झाला आहे.
भारतात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये जवळपास दीड लाख लोक मरण पावतात. तर, सुमारे 3 लाख लोक अपंग होतात. ते पुढे म्हणाले की, जागतिक रस्ते अपघातांपैकी अकरा टक्के अपघात भारतात होतात. वास्तविक, राष्ट्रीय जीडीपीपैकी 3.14 टक्के तोटा हा केवळ रस्ते अपघातांमुळे झाला आहे.
येत्या काळात रस्ते अपघात घटतील…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, ‘आपले सरकार हे रस्ते अपघात रोखण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. पूर्वीच्या तुलनेत सध्या रस्ते अपघात 20 टक्क्यांनी कमी झाले आहेत. आणि आम्ही अजूनही यासाठी प्रयत्न करत आहोत.’ त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, ‘सरकारचे प्रयत्न पाहता आम्हाला विश्वास आहे की, येणाऱ्या काळात यात आणखी घट होईल आणि आम्ही त्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत.’
या सगळ्यावर तामिळनाडूचे उदाहरण देताना गडकरी म्हणाले की, ‘तामिळनाडू या राज्यात रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. हे फक्त मोटार वाहन कायद्यामुळे शक्य झाले आहे.’ मोटार वाहन दुरुस्ती कायदा, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळासह स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचे आदेश देतो.
खराब रस्ते बनवणाऱ्यास कठोर शिक्षा…
रस्ते अपघात आणि त्यादरम्यानचे मृत्यू यावर बोलताना, रस्त्याच्या सदोष रचनेसाठी जबाबदार असणाऱ्यांनादेखील नितीन गडकरी यांनी सक्त ताकीद दिली आहे. ते म्हणाले की, ‘असे खराब रस्ते बांधणाऱ्यांना कडक शिक्षा होणार आहे.’ पुढे ते म्हणाले की, स्पीड कंट्रोल आणि इतर उपाययोजनांच्या माध्यमातूनही रस्ते अपघातात सुधारणा झाली आहे. सध्या शासन, विशेषत: देशाचे भावी नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि रस्ता सुरक्षेचे प्रश्न समजून घेण्यासाठी विशेष उपाययोजना करत असल्याचे देखील नितीन गडकरी यांनी सांगितले.

