रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार
केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करतात पण तोडगा निघत नाही. हा कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही, त्यामुळे आधीचाच कायदा कायम ठेवावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दानवेंवर निशाणा साधला आहे. ‘दानवे यांचं हे वक्तव्य तथ्यहीन आहे. शेतकरी आंदोलन करत असताना असं बोलायला नको होतं. पण ते मी असं बोललोचं नाही’, असं स्पष्टीकरण नंतर ते देतील, असा टोलाही अजितदादांनी लगावला आहे.
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारनं हटवादीपणा सोडायला हवा, असं म्हटलंय. केंद्र सरकारच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करतात पण तोडगा निघत नाही. हा कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही, त्यामुळे आधीचाच कायदा कायम ठेवावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
लसीकरणाबाबत राज्य सरकारची तयारी
कोरोनाची लस आल्यावर लसीकरणाबाबत राज्य सरकारची तयारी योग्यपद्धतीनं सुरु आहे. आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांसोबत लष्करी जवानांनाही सर्वात आधी लस देण्याबाबत प्रयत्न केला जाईल, असं अजित पवार म्हणाले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय राखला जात आहे. ५० वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना आधी लस दिली जाईल, अशी शक्यताही अजितपवार यांनी व्यक्त केली आहे.
दानवेंच्या वक्तव्यावरुन राऊतांचा केंद्राला टोला
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शैलीत समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. आपण चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या दानवे यांनी हे वक्तव्य केले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी सबळ पुरावे असणारच. यावर केंद्रीय मंत्रिमंडळातही चर्चा झाली असेल. त्यामुळे लडाखमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीकडे तुर्तास दुर्लक्ष करा. पण सिंघू बॉर्डरपर्यंत आतमध्ये शिरलेल्या चीनला सर्वप्रथम रोखले पाहिजे. दानवेंचे वक्तव्य प्रमाण मानून आपण भारतात अराजक आणि अशांती माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनवर आपण हल्ला केला पाहिजे, असा जोरदार टोला राऊत यांनी केंद्राला लगावला आहे.

