राष्ट्रवादीचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नवी दिल्लीत क्षीरसागर-गडकरी भेट पार पडली.
मुंबई : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज (मंगळवार) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नवी दिल्लीत क्षीरसागर-गडकरी भेट पार पडली. खुद्द शरद पवार यांनी क्षीरसागर यांना गडकरींना भेटण्यासाठी त्यांची वेळ घेऊन दिली होती.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भाने भेट घेतली होती. यावेळी बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाबाबतचा विषय निघताच पवारांनी तातडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वेळ घेऊन त्यांना भेटण्याचं क्षीरसागरांना सुचवलं. त्यानुसार आज ही भेट घेतल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज सकाळी (मंगळवार) भेट घेऊन बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग NH-52 कोल्हारवाडी- बार्शीनाका- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिरेवाडी या 12 किलोमीटर मार्गाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याबाबत तसेच शहरालगतच्या बायपासवरील स्लिप रोड व सर्व्हिस रोडच्या संदर्भाने सविस्तर निवेदन सादर करुन याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी केल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं.
दरम्यान, मंत्री गडकरी यांनीही याबाबत सकारात्मक आश्वासन देऊन सूचित केलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देऊ, असं आश्वासन दिल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं.
तैलिकची जबाबदारी संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर
आमदार संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर अगदी काही दिवसांपूर्वी एक नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्याच्या तैलिक महासभेच्या युवा अध्यक्षपदाची धुरा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या खांद्यावर दिली गेली आहे.
संदीप क्षीरसागर हे तैलीक समाजाचे नेतृत्व करणारे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात भाजप खा. रामदास तडस यांच्या उपस्थितीत आमदार क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवड कार्यक्रमाकडे मात्र संदीप यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाठ फिरवली. त्यामुळे क्षीरसागर काका-पुतण्यांमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

