चीन आणि पाकिस्तानशी एकाचवेळी युद्ध झाल्यास भारत काय करणार?
नवी दिल्ली: लडाखमध्ये भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यामुळे धक्का बसलेल्या चीनने आता पाकिस्तानला (Pakistan) सोबत घेऊन भारताविरुद्ध युद्ध करण्याचा डाव आखल्याची माहिती समोर आली आहे. याची कुणकुण लागताच भारतीय लष्करानेही मोठ्याप्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. 15 दिवसांच्या महायुद्धासाठी पुरेल इतका शस्त्रसाठा भारताकडून गोळा केला जात असल्याचे समजते. भारतीय लष्कराकडून (Indian Army) विशेषाधिकाराचा वापर करून इतर देशांकडूनही शस्त्रास्त्रांची खरेदी केली जात आहे. या सगळ्यासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे समजते.
ही सर्व परिस्थिती पाहता भारतीय लष्कर चीन आणि पाकिस्तान अशा दोन आघाड्यांवर युद्ध लढण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात तशी वेळ आल्यास 15 दिवसांच्या महायुद्धासाठी पुरेल, इतका दारुगोळा भारताकडून साठवला जात आहे. यापूर्वी भारतीय लष्कराकडे केवळ 10 दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा आणि दारुगोळा होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच हा साठा वाढवण्यास मंजुरी देण्यात आली.
यापूर्वीच्या निकषांनुसार भारतीय लष्कराकडे युद्धकाळात 40 दिवसांचा शस्त्रसाठा असणे आवश्यक होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये दारुगोळ्याचा साठा आणि युद्धाचे बदललेले स्वरुप पाहता हा कालावधी 10 दिवसांपर्यंत खाली आणण्यात आला होता.
तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या वित्तीय अधिकारांमध्ये वाढ
उरी हल्ल्यानंतर आपल्याकडील शस्त्रसाठा कमी असल्याची बाब भारतीय लष्कराच्या निदर्शनास आली. या पार्श्वभूमीवर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांना जादा वित्तीय अधिकार देऊ केले होते. तोपर्यंत तिन्ही दलांच्या प्रमुखांना 100 कोटी रुपयांपर्यंतची शस्त्रखरेदी परस्पर करता येत होती. मात्र, पर्रिकर यांच्या आदेशामुळे सैन्यप्रमुखांना 500 कोटी रुपयांपर्यंतच्या व्यवहारांना स्वत:च्या अखत्यारित मंजुरी देण्याचे अधिकार मिळाले होते.
भारतीय लष्कराकडून नक्की कोणती खरेदी?
भारतीय लष्कराकडून सध्या शस्त्रास्त्रांचे विविध सुटे भाग, क्षेपणास्त्रे आणि शत्रुशी सक्षमपणे सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रणांची खरेदी केली जात आहे. रणगाडे आणि तोफांसाठी मोठ्याप्रमाणावर दारुगोळा आणि क्षेपणास्त्रे खरेदी केली जात आहेत. लडाख सीमेवर तणावाचे वातावरण असल्यामुळे भारत आणि चीन यांच्यात कधीही युद्ध होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा गलवान खोऱ्यासारखा संघर्ष झाल्यास भारत आणि चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

