मग मी मंत्रालयात कसा येऊ? रामदास आठवलेंचा राज्य सरकारला सवाल!
राज्य सरकारनं आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात ड्रेसकोड लागू केला आहे. त्यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला एक मिश्किल प्रश्न विचारलाय.
मुंबई: राज्य सरकारनं आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात ड्रेसकोड लागू केला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावे याबाबत सरकारनं काही निर्देश आखून दिले आहेत. त्यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला एक मिश्किल प्रश्न केलाय. मग मी मंत्रालयात कसा येऊ? असं रामदास आठवले यांनी विचारलं आहे.
राज्यसरकार ने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?, असं ट्वीट रामदास आठवले यांनी केलं आहे.
दरम्यान, सरकारनं दिलेले निर्देश हे केवळ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत. त्यामुळे मंत्री किंवा नेतेमंडळींचा संबंध नाही. पण रामदास आठवले यांनी आपला एक रंगीबेरंगी कपड्यातला फोटो ट्वीट करुन राज्य सरकारच्या या निर्णयावर मिश्किलपणे टीका केली आहे.
रामदास आठवलेंना ट्विटरवरुन सल्ले!
रामदास आठवले यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले आहेत. त्यात राज्यपालांना भेटा, सरळ राजीनामा देऊन टाका, अशा सल्ल्यांचाही समावेश आहे. तर काहींनी त्यांना तुम्ही राज्यात नाही केंद्रात आहात, अशी आठवणही करुन दिली आहे.

