शिर्डीतील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या ठिकाणी ही घटना घडली आहे.
अहमदनगर : शिर्डीमध्ये एका लग्नातून तब्बल 100 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नातील जेवणातून ही विषबाधा झाल्याचे बोललं जात आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिर्डीतील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या ठिकाणी ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या ठिकाणी दुपारी लग्नसभारंभ आयोजित करण्यात आला होता. या विवाहसोहळ्यात 200 हून अधिक व्यक्ती सहभागी झाले होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी जेवणाला सुरुवात केली.
या विवाहसोहळ्यात वऱ्हाडी जेवत असताना अचानक अनेकांना उलट्या, मळमळ, जुलाब असा त्रास होऊ लागला. त्यानंतर लग्नातील जेवणातून ही विषबाधा झाल्याचे उघड झाले.
या लग्नसोहळ्यातील जेवणातून तब्बल 100 जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांवर सध्या विवेकानंद नर्सिंग होम , लोणीच्या प्रवरा रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विषबाधा झालेल्या या सर्वांची प्रकृती कशी आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

