बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचा एनसीबीकडून खोलवर तपास सुरू असतानाच आता मुंबईच्या या ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन टॉलिवूडशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई: बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचा एनसीबीकडून खोलवर तपास सुरू असतानाच आता मुंबईच्या या ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन टॉलिवूडशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीबीने शनिवारी रात्रभर वांद्रे आणि मिरारोड येथील महत्त्वाच्या ठिकाणी छापेमारी केली असता एका टॉलिवूड अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आलं असून या छापेमारीत सुमारे 10 लाख रुपये किंमतीचे ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे ड्रग्ज रॅकेटचं जाळं केवळ बॉलिवूडपुरतंच मर्यादित राहिलं नसून त्याचा पसारा टॉलिवूडपर्यंत गेल्याचं बोललं जात आहे.
एनसीबीने काल वांद्रे आणि मिरारोड येथे छापेमारी केली. मिरारोडमधील क्राऊन बिझनेस हॉटेलमध्ये एनसीबने छापा मारला होता. यावेळी ड्रग सप्लायर सईदसोबत एक टॉलिवूड अभिनेत्री आढळून आली. या अभिनेत्रीबरोबरचा सप्लायर फरार असून अभिनेत्रीला एनसीबीने अटक केली आहे. हे हॉटेल आणि हॉटेलचा संचालक गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या रडारवर होते. एनसीबीला टिप मिळताच त्यांनी ही कारवाई करून अभिनेत्रीला ताब्यात घेतलं आहे. ही अभिनेत्री 1 जानेवारी रोजी या हॉटेलमध्ये उतरली होती. या छाप्यात 10 लाखाचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. तसेच फरार सईदचं बॉलिवूड ड्रग्जशी कनेक्शन आहे का? याचा शोध घेण्यात येत आहे.
हॉटेलच संशयाच्या भोवऱ्यात
मिरारोडमधील क्राऊन बिझनेस हॉटेल सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात असून हॉटेल विषयीची अधिक माहिती घेण्यात येत आहे. या हॉटेलमध्ये आतापर्यंत कोणकोण उतरले होते, त्यांची काही ड्रग्जची हिस्ट्री आहे का? याचीही माहिती घेण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
वांद्रे येथे 400 ग्रॅम ड्रग्ज जप्त
वांद्रे येथेही शनिवारी रात्री एनसीबीने छापे मारले असून चांद मोहम्मद शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडे एनसीबीला 400 ग्रॅम ड्रग्ज आढळून आले. चांद मोहम्मद हा मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामावर होता. मात्र, त्याचा ड्रग्ज तस्करीत सहभाग आढळून आला आहे.

