काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे.
मुंबई: औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला आहे. शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचे उत्तर द्यावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सध्या राज्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरला असून त्या माध्यमातून शिवसेनेची कोंडी केली जात आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, ही शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र, आता काँग्रेससोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. तर काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवसेना आणि काँग्रेस भावनेच्या राजकारणाला फसणार नाहीत’
निवडणुका आल्या की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जातात. ही काही मंडळींची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या चालीला फसणार नाहीत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
नाव बदलल्याने सामान्य माणसाचं जीवन बदलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
तर ठाकरे सरकारला धोका, निरुपमांचा ‘औरंगाबाद’वर इशारा
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचे सरकार हे वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारे चालते. हा कॉमन मिनिमम प्रोगाम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोला संजय निरुपम यांनी शिवसेनेला लगावला.

