मेलबर्नमधील रेस्टॉरंटमधील जेवणाच्या प्रकरणानंतर बायोसिक्योरिटीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना आयोसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
मेलबर्न : मेलबर्नमधील रेस्टॉरंटमधील जेवणाच्या प्रकरणानंतर बायोसिक्योरिटीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना आयोसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, या खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे पाचही खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सर्व भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची रविवारी (3 जानेवारी) कोरोनाबाबतची तपासणी करण्यासाठी RT-PCR टेस्ट करण्यात आली. आज सकाळी त्याचा रिपोर्ट आला आहे. त्यामध्ये सर्व खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब आहे. कारण भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा, यष्टीरक्षक ऋषभ पंत, नवदीप सैनी, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ या खेळाडूंना आता आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार नाही. भारतीय संघ आज मेलबर्नहून सिडनीला रवाना होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
नववर्षानिमित्त टीम इंडियाचे एकूण 5 खेळाडू हे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. यामध्ये रोहित शर्मा , शुभमन गिल, प्रथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि नवदीप सैनीचा समावेश होता. यावेळी नवलदीप सिंह या चाहत्याने या खेळाडूंसह फोटो काढले. चाहत्याने भारतीय खेळाडूंसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर या खेळाडूंकडून कोरोना नियमांचे उल्लंघन झाले का? या बाबतची तपासणी करण्यात आली.
या 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना धोका निर्माण होऊ नये म्हणून ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाच्या वैदयकीय पथकाच्या सल्ल्यानुसार या पाचही जणांना आयसोलेट करण्यात आलं आहे. तसेच या खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन झालं का, याबाबतही चौकशीही करण्यात आली आहे.
पाकिस्तानी खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान टीमच्या खेळाडूंनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. हे खेळाडू विनामास्क फिरताना तसेच हॉटेल कर्मचाऱ्यांकडून जेवण स्वीकारताना सीसीटीव्हीमध्ये आढळले होते. वारंवार इशारा देऊनही हे पाकिस्तानी खेळाडू सुधारले नाही. त्यामुळे परत कोरोना नियमांच उल्लंघन केल्यास पाकिस्तानला पाठवू, अशी तंबी न्यूझीलंडच्या वैद्यकीय पथकाने दिली होती. यानंतर पाकिस्तानचे खेळाडू वठणीवर आले.
सिडनीत कांटे की टक्कर
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. उभय संघांमध्ये अॅडलेड येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेट राखून भारताचा पराभव केला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या 36 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 विकेटने मात केली होती. दरम्यान सिडनीनंतर दोन्ही संघ ब्रिस्बेनला जातील. या मैदानावर 15 जानेवारीपासून चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

