अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील भाजपच्या नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, मराठा आरक्षण, याबद्दल भूमिका मांडली.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील भाजपच्या नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, केंद्राकडून येणारे पैसे याबद्दल भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अजित पवारांनी याबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले. उद्या पुण्याला जाणार आहे. सध्या पक्षांतर बंदी कायदा आहे. पक्ष सोडल्यास त्यांचं नगरसेवकपद रद्द होईल. भाजपच्या नगरसेवकांचं पक्षांतर ही ऐकीव माहिती आहे. काही मिळालं नाही की माध्यमं अशा बातम्या पसरवात, असं अजित पवार म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नगरसेवकांच्या पक्षांतरांच्या चर्चांविषयी विचारलं असता मांध्यमांना सुनावलं होतं.
मराठा आरक्षण टिकवण्याासाठी सरकार काम करतंय
महाविकास आघाडी सरकार सुरुवातीपासून मराठा आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. एखादं प्रकरण सुप्रीम कोर्टात असते त्यावेळी निकाल काय लागतो, याची वाट पाहावी लागते. मराठा समाजातील युवकांनी आत्महत्येसारख्या मार्गानं जाऊ नये, असं अजित पवार म्हणाले. एमपीएससी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरही अजित पवारांनी मत मांडले. एमपीएससीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला नको होती. राज्यातील विविध अडचणींवर आम्ही योग्य मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले.

