आधी आरोग्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त; आता मुख्यमंत्री म्हणतात, अधिक दक्षता घ्या

0 झुंजार झेप न्युज

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला.

मुंबई : ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात आहे. तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले. 

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

कोरोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच झाला. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

“ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून इतर राज्यातील विमानतळांवर उतरुन प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरुन क्वारंटाईन करावे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, “लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरणाच्या तयारीचे सादरीकरण केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.