मिळकत कर आणि दंडाच्या रकमेतून पुणे महापालिका मालामाल!

0 झुंजार झेप न्युज

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतानाही मार्च ते सप्टेंबरच्या पहिल्या 6 महिन्यात पुणे महापालिकेला साडे आठशे कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

 पुणे: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विविध शहरातील जवळपास सर्वोच उद्योग-व्यवसाय बंद होते. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली. पण अनलॉकनंतर पुणे महापालिकेला मोठं उत्पन्न मिळालं आहे. पुणे महापालिकेला मिळकतकरातून पहिल्यांदाच 1 हजार 300 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावातही पुणेकरांनी पहिल्यापासून पालिकेचा कर भरण्यास प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. 

अभय योजनेचा मोठा फायदा

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतानाही मार्च ते सप्टेंबरच्या पहिल्या 6 महिन्यात पालिकेला साडे आठशे कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्याचबरोबर पुणे महापालिकेनं थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेमुळं दोन महिन्यात पालिकेच्या उत्पन्नात अजून साडे तिनशे कोटी रुपयांची भर पडली आहे. जवळपास 18 हजार नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मागील एका महिन्यात 70 कोटी रुपयांची भर पुणे महापालिकेच्या तिजोरीत पडली आहे. यापूर्वी संपूर्ण आर्थिक वर्षात महापालिकेला मिळालेलं सर्वाधिक उत्पन्न 1 हजार 262 कोटी रुपये होतं. पण यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावातही पुणे महापालिकेला 1 हजार 300 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.

पुणेकरांकडून 18 कोटी दंड वसूल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन न करणे, मान न वापरणे आणि रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून 18 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येतात. तरीही लाखो लोक बेशिस्तपणे वर्तणूक करताना पाहायला मिळतात. पुणे महापालिका प्रशासनाकडून बेशिस्तपणे वागणाऱ्या जवळपास 2 लाख 71 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 18 कोटी 64 लाख रुपये दंड वसूल करण्यात आलाय. प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन न करणारे सर्वाधिक लोक हे ग्रामीण भागातील आहेत आणि त्याखालोखाल पुणेकरांचा नंबर लागतो.

संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणेकरांसाठी अजून एक महत्वाची बातमी आहे. येत्या गुरुवारी (7 जानेवारी) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरठा विभागाकडून देण्यात आली आहे. दुरुस्तीनंतर शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.