विदर्भाच्या इतिहासात सोमवारचा दिवस अतिशय महत्वाचा ठरला आहे. कारण, नागपूर विधीमंडळ सचिवालय वर्षभर सुरु राहणार आहे.
नागपूर: विधीमंडळ सचिवालयाचं कामकाज नागपुरात सुरु झालं. पहिल्या दिवशी उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी मागण्यांचं पत्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिलं आहे. तसंच पटोले यांनी विदर्भातील लोकप्रतिनिधींसाठी विविध मागण्यांची नोंदणी पटोले यांनी करुन घेतली आहे.
विदर्भाच्या इतिहासात सोमवारचा दिवस अतिशय महत्वाचा ठरला आहे. कारण, कालपासून नागपूर विधीमंडळ सचिवालय वर्षभर सुरु राहणार आहे. विदर्भातील आमदारांना आपले प्रश्न, लक्षवेधी सूचना किंवा इतर कामांसाठी वेळोवेळी मुंबईत जाण्याची गरज आता लागणार नाही. त्याची सुरुवात काल काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी केली आहे. सचिवालयात प्रमुख खात्याचे अधिकारी उपस्थित असावेत. लक्षवेधी ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारावी, स्विय सहाय्यकांचे प्रशिक्षण घ्यावे आणि नागपूर सचिवालयातील माहिती पुस्तिका प्रकाशित करावी, अशा मागण्यांचं पत्र पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे देण्यात आलं आहे.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. तेव्हा झालेल्या करारानुसार राज्य सरकारच्या तीन अधिवेशनांपैकी एक अधिवेशन नागपुरात घेण्यात येतं. आता नागपुरात सचिवालयही नेहमीसाठी सुरु राहणार असल्यानं विदर्भातील जनतेची मोठी सोय होणार आहे.
विधानसभाध्यक्ष नाना पटोलेंचा पुढाकार
विधीमंडळाचं नागपुरातील हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर विधीमंडळ सचिवालयाचं कामकाज बंद करण्यात येतं. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत नागपुरातील कार्यालय बंद राहत होतं. मात्र, विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांचा समावेश असलेल्या मंडळानं विधान भवन नागपूर इथलं कार्यालय वर्षभरासाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपुरात विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
विदर्भात एकूण 11 जिल्हे आहे. विधानसभेचे 62 मतदारसंघ आहेत. तसंच विधान परिषदेते शिक्षक मतदारसंघ 2, पदवीधर मतदारसंघ 2 आणि स्थानिक प्राधिकारी संस्था 5 असे एकूण 9 मतदारसंघ या विभागात येतात. तसंच नागपूर हे उपराजधानीचं शहर आहे. भौगोलिकदृष्ट्या देशातील मध्यवर्ती शहर असल्यामुळे नागपुरात विधीमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष सुरु व्हावा, त्याचबरोबर लोकसभेतील ब्युरो ऑफ पार्लमेंटरी स्टडीज अँड ट्रेनिंगचं एक केंद्र सुरु व्हावं, अशी विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंची संकल्पना आहे.

