लाल वादळ’ राजभवानाच्या दिशेने, मोर्चेकऱ्यांना अडवलं; पोलिसांबरोबर आंदोलकांची झटापट

0 झुंजार झेप न्युज

रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. 

मुंबई: रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं आहे. त्यामुळे मोर्चेकरी आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत रस्त्यावरच एल्गार पुकारल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

आझाद मैदानात नेत्यांची भाषण झाल्यानंतर शेतकरी नेते अजित नवले, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि सचिन सावंत आदी नेते मोर्चेकऱ्यांसोबत राजभवनाकडे निघाले होते. या नेत्यांसोबत हजारो मोर्चेकरी लालबावटे घेऊन राजभवनाकडे निघाले. अचानक मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाल्याने पोलिसांनी मेट्रो सिनेमाजवळ शेतकऱ्यांना अडवलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यामुळे ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मेट्रो सिनेमाजवळच्या चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. काँग्रेस नेते भाई जगताप, सचिन सावंत, अजित नवले यांनी रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तापलं होतं.

आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आंदोलक अधिकच संतप्त झाले होते. त्यामुळे भाई जगताप, सचिन सावंत, अजित नवले, किशोर ढमाले आदी नेत्यांनी मेट्रो चौकात रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी काही आंदोलक ट्रॅक्टर घेऊन आले होते. पोलिसांनी या आंदोलकांनाही मध्येच अडवलं.

मोर्चाला पोलिसांचा वेढा

दरम्यान, मेट्रो सिनेमाच्या चौकात पोलिसांनी आंदोलकांना अडवलं असून त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही राजभवनाच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आधीच या मोर्चाला मनाई केली आहे. त्यामुळे या आंदोलकांना मेट्रो चौकात अडवलं आहे.

पोलीस व्हॅनमधून राजभवनकडे

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या 23 प्रतिनिधींनाच राजभवनाकडे जाण्याची परवानगी दिली आहे. राजभवनाकडे जाण्यासाठी या प्रतिनिधींना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.