पुण्यात मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली होती.
पुणे : पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला (Serum Institute Building) आज दुपारी भीषण आग लागली होती. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश मिळालं. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आग विझल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली व त्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ही आग इमारतीत सुरु असलेल्या वेल्डिंगच्या कामादरम्यान लागली असावी.”
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. तिथे विजेचं आणि वेल्डिंगचं काम सुरु होतं, त्यादरम्यान ही आग लागली असावी.”
मोहोळ म्हणाले की, “सुरुवातीला आम्हाला माहिती मिळाली होती की, इमारतीत चार जण अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की, या आगीत एक मजला जळून खाक झाला आहे, तसेच यावेळी पाच जण दगावले आहेत. मृतांमध्ये इमारतीच्या बांधकामावर काम करणारे कंत्राटी कामगार असू शकतात.”
कोरोनावरील लसी सुरक्षित
दरम्यान सीरम इन्स्टिट्यूटमधील कोरोनावरील लसींच्या साठ्यावर या आगीचा काही परिणाम झाला आहे का? असा सवाल केल्यानंतर महापौर म्हणाले की, “सर्व लसी तळमजल्यावर ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे लसींचं काही नुकसान झालेलं नाही. दरम्यान या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर वित्तहानी किती झाली आहे, याबाबत अद्याप काहिही सांगता येणार नाही.”
तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश
पुण्यातील मांजरा परिसरात असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीत आज दुपारी आग लागली होती. या आगीवर जवळपास तीन तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कोव्हिशील्ड (Covishield Vaccine) या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी दोन वाजता इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरत गेले. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नव्या बिल्डिंगमध्ये BCG लसीचं काम
ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटमधील आग लागलेल्या घटनास्थळाला भेट देणार आहेत. अजित पवारांनी आग लवकरात लवकर विझवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून दूरध्वनीवरुन परिस्थितीची माहिती घेतली. संस्थेतली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत करण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही आगीची दखल घेण्यात आली असून गृह विभागाला आगीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

