अखिल भारतीय किसान सभेचं ‘लाल वादळ’ मुंबईत धडकलं

0 झुंजार झेप न्युज

अखिल भारतीय किसान सभेचं नाशिकहून निघालेलं लाल वादळ आता मुंबईत धडकलं आहे. हाजारो शेतकऱ्यांना हा मोर्चा थोड्याच वेळात वडाळा शिवडी मार्गे आझाद मैदानात धडकणार आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचं नाशिकहून निघालेलं लाल वादळ आता मुंबईत धडकलं आहे. हाजारो शेतकऱ्यांना हा मोर्चा थोड्याच वेळात वडाळा शिवडी मार्गे आझाद मैदानात धडकणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा आसूड आता महाराष्ट्रातही कडाडल्याचं पाहायला मिळत आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चानं हे आंदोलन पुकारलं आहे. सुमारे 20 हजार शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित नवले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकवरून सुरू झाला. काल संध्याकाळी अखिल भारतीय किसान सभेचा हा लाँग मार्च सुरू झाला. एकूण 21 जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. सर्व जण पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. घोषणा देत, गाणी म्हणत, ढोल वाजवत आणि हातात लाल बावटा घेऊन शेतकऱ्यांचा हा जत्था कसारा घाटापर्यंत आला आहे. काल रात्री इगतपुरीतील घाटंदरी येथे या शेतकऱ्यांनी मुक्काम केला. त्यानंतर पुन्हा पहाटे नव्या उमेदीने सर्व शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले. आता हा मोर्चा मुंबईत दाखल झाला असून, थोड्याच वेळात हे आंदोलन आझाद मैदानात पोहोचतील.

कृषी कायदा रद्द करण्याची मागणी

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी आमचा मोर्चा आहे. त्याशिवाय राज्य सरकारकडे आमच्या काही मागण्या आहेत. महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात महात्मा फुले कर्ज माफी योजना स्थगित केली होती. ही योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आम्ही आझाद मैदानात धरणे धरणार आहोत, असं अजित नवले यांनी सांगितलं. एवढेच नव्हे तर आमचं हे आंदोलन संपूर्ण देशभर पसरणार असून सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजेत, असा इशाराही नवले यांनी सरकारला दिलाय.

शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. इतकच नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील शेतकरी मोर्चात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक फ्रेम आपल्या डिस्प्ले पिक्चरला लावली आहे. शेतकरी आंदोलनाला राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आणि इतर नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं यासाठी त्यांनी सोशल मीडियावर अभिनव पद्धतीने लोकसहभाग मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर लाखो नागरिक सक्रिय असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आंदोलन पोहचवण्याचा उद्देश शरद पवार यांचा असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.