‘बर्ड फ्लू’ हा आजार एखाद्या विषाणूजन्य संसर्गाप्रमाणेच आहे. जो केवळ पक्ष्यांसाठीच नाही, तर इतर प्राणी व मानवासाठीदेखील तितकाच धोकादायक आहे.
मुंबई : कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. याच दरम्यान आता दुसर्या एका आजाराने लोकांची चिंता वाढवली आहे. सध्या भारतात ‘बर्ड फ्लू’च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. बर्ड फ्लू हा आजार ‘एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरस’ (H5N1) द्वारे होतो. बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रकरणांमुळे राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि हिमाचल प्रदेशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विषाणू संक्रमित पक्षी आणि मानव दोघांसाठीसुद्धा धोकादायक आहे.
‘बर्ड फ्लू’ हा आजार एखाद्या विषाणूजन्य संसर्गाप्रमाणेच आहे. जो केवळ पक्ष्यांसाठीच नाही, तर इतर प्राणी व मानवासाठीदेखील तितकाच धोकादायक आहे. ‘बर्ड फ्लू’ने बाधित झालेल्या पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्राणी व मानवांना त्याची लगेच लागण होते. हा विषाणू इतका धोकादायक आहे की, यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
बर्ड फ्लूची लक्षणे :
कफ, अतिसार, ताप, श्वसन समस्या, डोकेदुखी, स्नायू वेदना, घसा खवखवणे, वाहणारे नाक आणि अस्वस्थता या सारख्या समस्या ‘बर्ड फ्लू’ची लक्षणे आहेत. जर, आपल्याला देखील यापैकी कोणती लक्षणे जाणवत असतील, तर दुसर्या एखाद्याच्या संपर्कात येण्यापूर्वी डॉक्टरांची भेट घ्या.
बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लूचे बरेच प्रकार आहेत. परंतु, H5N1 हा मानवाला संक्रमित करणारा पहिला एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. त्याची पहिली घटना 1997मध्ये हाँगकाँगमध्ये समोर आली होती. त्यावेळी पोल्ट्री फार्ममधील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव संक्रमित कोंबड्यांमुळे झाला होता (Bird Flu symptoms, Causes, treatment and precaution).
H5N1 हा विषाणू पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवतो. परंतु, तो पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरतो. हा रोग संक्रमित पक्ष्याच्या मल, अनुनासिक स्राव, तोंडातील लाळ किंवा डोळ्यांतील पाण्याचे संपर्क आल्यास होतो. संक्रमित कोंबड्यांचे मांस 165ºF वर शिजवल्यास किंवा अंडी वापरल्यास त्याने बर्ड फ्लू पसरत नाही. परंतु, संक्रमित कोंबड्यांची अंडी कच्ची किंवा उकडून खाऊ नयेत.
बर्ड फ्लूचा धोका कोणाला?
H5N1 दीर्घकाळ जिवंत राहणारा विषाणू आहे. हा विषाणू संक्रमित पक्ष्यांच्या मल आणि लाळेत 10 दिवस जिवंत राहतो. दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्याने, हे संक्रमण पसरले जाऊ शकते. पोल्ट्रीशी संबंधित लोकांमध्ये याचा प्रसार होण्याचा उच्च धोका असतो.
या व्यतिरिक्त, जे लोक संक्रमित ठिकाणी भेट देतात, संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येतात, कच्चे किंवा उकडलेले अंडे खातात किंवा संक्रमित रुग्णांची काळजी घेतात, त्यांनादेखील बर्ड फ्लूची लागण होऊ शकते.
यावर उपचार काय?
बर्ड फ्लूच्या विविध प्रकारांवर वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले जातात. परंतु, बहुतेक प्रकरणांमध्ये अँटीवायरल औषधं देऊन उपचार केले जातात. लक्षणे दिसल्यानंतर 48 तासांच्या आत औषधे घेणे आवश्यक आहे. बर्ड फ्लूची लागण झालेल्या व्यक्ती शिवाय, त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर सदस्यांनाही या आजाराची लक्षणे नसली तरी ही औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो.
कसे संरक्षण करावे?
बर्ड फ्लू टाळण्यासाठी, डॉक्टर आपल्याला यावरील लस घेण्याचा सल्ला देतात. या व्यतिरिक्त, गर्दीच्या जागी हिंडणे, संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येणे आणि अर्धवट शिजलेले कोंबडीचे मांस खाणे या गोष्टी टाळाव्यात. तसेच, स्वच्छता राखून वेळोवेळी आपले हात धुवा.

