पुण्यात मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली
पुणे : पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला (Serum Institute Building) भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे. कोव्हिशील्ड (Covishield Vaccine) या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. दुपारी दोन वाजता आग लागल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Pune Serum Institute Building Fire)
कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
नव्या बिल्डिंगमध्ये BCG लसीचं काम?
ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
कोव्हिशील्ड लस देशभरात रवाना
कोव्हिशील्ड लसीचे डोस 11 जानेवारीला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लसीचे काही डोस देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये रवाना झाले. यावेळी कंटेनरमध्ये भरल्यानंतर त्याची नारळ फोडून पूजा करण्यात आली होती. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात पुणे विमानतळावरुन लसीचे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठवण्यात आले. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

