3200 चालक आणि वाहक अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यासंदर्भात आज या उमेदवारांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं 2019 साली सरळ सेवा भरती अंतर्गत साडेचार हजार उमेदवारांची निवड केली होती. मात्र, त्यापैकी 3200 चालक आणि वाहक अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यासंदर्भात आज या उमेदवारांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी उमेदवारांनी आपल्या समस्या मांडून फडणवीसांकडे मदतीची मागणी केली आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस काय पाऊलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
अधिक माहितीनुसार, एसटी महामंडळानं 2019 झाली सरळ सेवेअंतर्गत महाराष्ट्रातून 4500 उमेदवार निवडले होते. त्यापैकी तेराशे उमेदवारांना सेवापूर्व प्रशिक्षण देऊन त्यांना रुजू करण्यात आलं. मात्र, लॉकडाऊनच्या काळात 3200 उमेदवारांचं प्रशिक्षण स्थगित करण्यात आलं. यासं
दर्भात उमेदवारांनी वारंवार परिवहन मंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा केला. मात्र, अद्याप प्रशिक्षण सुरू होत नाही असं उमेदवारांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या काळात खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे आता सरळ सेवा अंतर्गत भरती झालेल्या 3200 उमेदवारांचे वेतन द्यावं आणि तातडीने प्रशिक्षण देऊन नियुक्ती करावी अशी मागणी या उमेदवारांनी केली आहे. या उमेदवारांमध्ये अनेक महिलासुद्धा आहेत. ज्या एसटी चालक (ड्रायव्हर ) आणि कंडक्टर (वाहक ) चं प्रशिक्षण घेण्यास तयार असून महाराष्ट्रच्या ग्रामीण भागातील रस्त्यावर एसटी चालवण्यासाठीदेखील तयार आहेत.
या इच्छूक महिलांनाही सेवेत सामावून घेतलं जात नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून तातडीने यावर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. खरंतर, दोन दिवसांआधीच “ज्या चालकांची 25 वर्षे विना अपघात सेवा झाली आहे, अशा चालकांना यापुढे राज्य स्तरावर सत्कार करून, 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल”, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. “चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्यांचेही आपण कौतुक करायला पाहिजे”, असेही मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे आता यादेखील उमेदवारांच्या नोकरीसंदर्भात निर्णय घेण्यात यावा अशी मागणी समोर येत आहे.

