आमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावलं

0 झुंजार झेप न्युज

शहराची नावं बदलून सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल झाला का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.

मुंबई : काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचं ध्येय सर्वसामान्यांचं कल्याण करणं हेच आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी स्पष्ट केलं. नामांतर करुन वातावरण बिघडायला नको, अशी काळजी थोरातांनी व्यक्त केली. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे सरकारला आघाडीतील मित्रपक्षाकडूनच विरोध होताना दिसत आहे.

छत्रपती संभाजी महाराज विमानतळाबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. आता केंद्र सरकार आणि भाजपची जबाबदारी आहे. शहराची नावं बदलून सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल झाला का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.

सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आनंदासाठी काम करावं, तेढ निर्माण करण्याचं काम नको. आमचा सत्तेत समान वाटा आहे. काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचं ध्येय सर्वसामान्यांचं कल्याण करणं आहे, असं थोरातांनी स्पष्ट केलं.

तीन पक्षांमध्ये मतमतांतरं होऊ शकतात, पण याचा सरकारवर काहीही परिणाम नाही. चर्चेने सर्व प्रश्न सोडवू. संजय राऊत यांनी तिन्ही पक्ष एकत्र कसे राहतील, याची अग्रलेखातून काळजी घेतली, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पाठवत औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेसला औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? असा रोखठोक सवाल केला आहे. त्यामुळे शिवसेना औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध

शिवसेनेच्या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.