काँग्रेस फिनिक्सप्रमाणे भरारी घेईल, राऊत यांना विश्वास; राहुल गांधींबाबत मोठं भाष्य

0 झुंजार झेप न्युज

 राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकश्यांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे.

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकश्यांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्रास देण्यासाठीच तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असं भाकीतही त्यांनी व्यक्त केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला जात आहे. केवळ त्रास देण्यासाठीच या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा

प्रत्येक घराण्याच्या नावाने पक्ष चालत असतो. गांधी आडनावाने जसा काँग्रेस पक्ष चालतो तसेच ठाकरे आडनावाने शिवसेना चालते. प्रत्येक घराणं हा त्या पक्षाचा चेहरा असतो, असं सांगतानाच गांधी कुटुंबाने देशाचं नेतृत्व करावं अशी जर जनतेची भावना असेल तर त्याचा सन्मान राखला पाहिजे. हीच खरी लोकशाही आहे, असं राऊत म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अपशब्दात टीका करणं चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही, असा टोला लगावतानाच राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक पक्षात द्वंद्व असंत. भाजपमध्येही होतं. समजावादी पक्षातही होतं. काँग्रेसमध्ये असेल तर बघिडले कुठे? पक्षात द्वंद्व असणं हे लोकशाहीचं लक्षण आहे, असं सांगतानाच काँग्रेस पक्ष मजबूत झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, ‘सामना’ अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर गंभीर टीका केली आहे. काळ्या धनवाल्यांनी पीएम केअर्स फंडात गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे. याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे?, असा सवाल केला. तसेच, “विरोधी पक्षाशी मतभेद असू शकतात, पण विरोधी पक्षाचा गळा आवळून त्यांचे मृतदेह दिल्लीच्या विजय चौकात लटकवायचे धोरण धक्कादायक आहे. राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत असा प्रचार करूनही गांधी अद्याप उभेच आहेत. ते मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्य़ांना वाटते. तसे नसते तर ऊठसूट गांधी परिवाराच्या बदनामीच्या शासकीय मोहिमा राबविल्या गेल्या नसत्या, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.

तसेच, लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटत असते. त्यातही प्रामाणिक योद्ध्याचे भय शंभर पटीने वाढत जाते, असे म्हणत राहुल गांधींविषय़ी वाटणारे भय शंभर पटीतले असल्याचा दावा ‘सामना’तून करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.