माझ्यासाठी गंभीर गोष्ट नाहीये, त्या समर्थ आहेत, त्या वर्षा संजय राऊत आहेत.
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा संजय राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या असून, तीन तासांहून अधिक वेळ झाला तरी वर्षा संजय राऊत ईडी कार्यालयात आहेत. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. वर्षा राऊत ईडी कार्यालयात गेल्यात हे आपल्या माध्यमातून समजलंय. त्या गेल्या असतील आल्यावरती पाहू, नोटीस मला आलेली नाही. आता मी घरी गेल्यावरती पाहतो, असं संजय राऊत म्हणालेत.
संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय तपास यंत्रणा आहे. कार्य पद्धतीविषयी काही विषयांवर मतभेद असले तरी सरकारी कागद येतो तेव्हा त्याचा सन्मान राखला पाहिजे, या मताचे आम्ही सगळे आहोत, असंही संजय राऊतांनी सांगितलं.
वर्षा राऊतांकडे लपवण्यासारखं काही नसल्यानं कोणत्या गोष्टीचा तपास कोणाला करायचा असल्यास त्यांनी जरूर करावा. एकदा तपास पूर्ण होऊ द्या, मग पाहू, असंही संजय राऊत म्हणालेत. तपास सुरू असताना ताकद दाखवण्याची गरज नाही. ताकद आमची आहेच. हे सगळं का आणि कोण करतंय याचीही माहिती जनतेला आहे. माझ्यासाठी गंभीर गोष्ट नाहीये, त्या समर्थ आहेत, त्या वर्षा संजय राऊत आहेत, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.
वर्षा राऊत यांना ED नोटीस
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वर्षा राऊत यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. वर्षा राऊत यांना PMC बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली.
काय आहे PMC बँक घोटाळा?
पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.
पीएमसी बँक प्रकरणी ठाकरे सरकारचा निर्णय
ठाकरे सरकारने सप्टेंबर महिन्यात पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. या घोटाळ्यातील रक्कम वसुलीसाठी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली होती.

