पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असंही ते म्हणालेत.
नाशिकः ”इगो बाजूला ठेवा, पोलिसांवर दबाव आणू नका”, असा रोखठोक इशारा नाशिक पोलीस आयुक्तांनी देवयानी फरांदेंना दिलाय. पोलीस आयुक्त दीपक पांडये (Police Commissioner Deepak Pandey) यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असंही ते म्हणालेत.
आमदार देवयानी फरांदे यांनी कोरोना काळात मोर्चा काढून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. लोकप्रतिनिधींनी आपला इगो बाजूला ठेवावा. अवैद्य धंदे सुरू असल्याचा साक्षात्कार फरांदे यांना त्यांच्यावर कारवाई झाल्यावरच का झाला?, असा सवालही पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी उपस्थित केलाय.सगळ्या लोकप्रतिनिधींसमवेत लवकरच बैठक घेऊन चर्चा करणार आहे. अवैद्य धंद्यांबाबत पोलीस नेहमीच सॉफ्ट टार्गेट आहेत, असंही त्यांनी सांगितलंय.
काय आहे प्रकरण?
देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात महिला अत्याचाराविरोधात 12 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. आरोपी इरफान शेख याच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलेल्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि मोर्चेकरी होते. त्यापैकी 200 जणांविरोधात इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली होती.
इंदिरानगर परिसारात हा मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी गोंधळ उडाला होता. यावेळी जमावबंदीचे आदेश असल्याचे सांगत आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, देवयानी फरांदे आणि पोलीस अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादामुळे इंदिरानगर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.
दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यादरम्यान गर्दी झाली की नाही याबाबत माहिती घेणार : दीपक पांडये
दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यादरम्यान झालेल्या गर्दीसंदर्भात ते म्हणाले, काल दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यादरम्यान गर्दी झाली की नाही याबाबत माहिती घेणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत, ते योग्य ती कारवाई करतील, असंही त्यांनी सांगितलं.

