बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन रवाना

0 झुंजार झेप न्युज

बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकापर्ण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला शनिवारी 23 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

मुंबई : राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान (Balasaheb Thackeray Statue Unveiling Ceremony) मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला (Balasaheb Thcakeray Birth Anniversary) जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे कृष्णकुंजवरुन कार्यक्रमस्थळावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन कुलाबा येथील कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदा एका मंचावर दिसणार आहेत (Balasaheb Thackeray Statue Unveiling ceremony).

बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा

हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. नऊ फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

कार्यक्रमाला कोण उपस्थित राहणार

बाळासाहेबांचे निकटचे स्नेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी असतील. या सोहळ्याला विशेष आतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

कोरोना संकटामुळे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, बाळासाहेबांच्या असंख्य चाहत्यांसाठी या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र

नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नाहीत. आता जर बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरप्रसंगी राज ठाकरे उपस्थित राहिले तर उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर येतील (Balasaheb Thackeray Statue Unveiled).

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

गेले काही वर्ष हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत. येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.