मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे के एल राहुल पुढील दोन्ही कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सिडनी कसोटीपूर्वी (Sydney Test) टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज के एल राहुल (KL Rahul) कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तो पुढील दोन्ही कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. नेट प्रॅक्टिसदरम्यान राहुलच्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळेच त्याला बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतून (Border Gavaskar Test Series) बाहेर पडावं लागलं. पहिल्या दोन्ही कसोटीतही राहुलला संघात स्थान मिळू शकलं नव्हतं.
दरम्यान, राहुलला झालेल्या दुखापतीमुळे त्याला 3 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो सिडनीवरुन भारतात परतणार आहे. तिथून तो थेट बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून दुखापतीमुळे मायदेशी परतणारा हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी मोहम्मद शमी आणि उमेश यादवही दुखापतीमुळे भारतात आले आहेत.
पहिल्या दोन कसोटीत संधी नाही
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात, के एल राहुल प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता. तिसऱ्या कसोटीत त्याची निवड होण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच त्याला दुखापतीने ग्रासल्याने, राहुल कसोटी मालिकेतूनच बाहेर पडला आहे.
कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाक खेळलेल्या T20 आणि वन डे मालिकेमध्ये राहुल भारतीय संघात होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वन डे सामन्यात राहुलने 93 धावा केल्या होत्या. तर 3 टी ट्वेण्टी सामन्यात एका अर्धशतकासह 81 धावा केल्या होत्या.
सिडनी कसोटी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सिडनी कसोटीला 7 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने तर दुसरी कसोटी भारताने जिंकल्याने मालिका 1-1 बरोबरीत आहे. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलला संधी मिळण्याची शक्यता होती. कारण मयांक अग्रवाल, हनुमा विहारी यांचा फॉर्म हरपला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि के एल राहुल यांना संघात स्थान देण्याचा विचार संघ व्यवस्थापनाचा आहे. मात्र आता राहुल मालिकेतूनच बाहेर पडला आहे.

