पश्चिम ब्ंगालमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून दिल्यानंतर आता बंगाल स्वारीचं मॉडल तयार करण्याच्या कामाला भाजप लागली आहे.
अहमदाबाद: पश्चिम ब्ंगालमध्ये प्रचाराचा धुरळा उडवून दिल्यानंतर आता बंगाल स्वारीचं मॉडल तयार करण्याच्या कामाला भाजप लागली आहे. आज मंगळवारपासून गुजरातमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्त्वाच्या नेत्यांची अहमदाबादमध्ये बैठक होणार आहे. तीन दिवसांच्या या बैठकीत पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरविण्यात येणार आहे.
आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या 36 अनुषांगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे महासचिव बीएल संतोष यांच्यासह अनेक नेते या बैठकीमध्ये सहभाही होणार आहे. या तीन दिवसांच्या बैठकीत बंगाल जिंकण्याची रणनीती ठरवण्याबरोबरच कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि राम मंदिराच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे.
नड्डा गुजरातच्या नेत्यांना भेटले
या बैठकीला हजर राहण्यासाठी जेपी नड्डा गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. विमानतळावरून ते थेट भाजप कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी गुजरा प्रदेशाध्यक्षांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी गुजरामधील पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच बंगालच्या निवडणूक प्रचारात भाग घेऊ इच्छिणाऱ्या गुजराती नेत्यांच्या नावावरही चर्चा करण्यात आली.
बंगाल जिंकण्याच्या प्लानवर चर्चा
अहमदाबादच्या कर्णावती कॉलेजमध्ये संघ आणि भाजपची बैठक होणार आहे. यंदा पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पैकी पुद्दुचेरी आणि आसाममध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे. तर तामिळनाडूत एआयएडीएमकेची सत्ता आहे. त्यामुळे या पाचही राज्यात भाजपचा कस लागणार आहे.
संघ बंगालमध्ये 1939 सालापासून कार्यरत आहे. या ठिकाणी डाव्यांची 34 वर्ष सत्ता होती. त्यामुळे डाव्यांच्या काळात संघ बंगालमध्ये हातपाय पसरू शकला नाही. 2011मध्ये डाव्यांची सत्ता गेली. त्यानंतर केंद्रात 2014मध्ये मोदींची सत्ता आली. त्यानंतर संघाने बंगालमध्ये हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्याचे परिणाम 2019च्या लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळाले.

