भारत बायोटेकने कोवॅक्सिन लसीचा दुष्परिणाम आढळल्यास भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
हैदराबाद : भारतातील कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली. भारत सरकारनं सीरम इनस्टि्ट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. सीरमच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसींचे डोस तयार करण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. भारत बायोटकेच्या कोवॅक्सिन लसीबद्दल काही डॉक्टरांनी शंका घेतली होती. आता भारत बायोटेकने कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर दुष्परिणाम झाल्यास भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्यास त्याला नुकसानभरपाई देण्यात येईल, असं भारत बायोटेकने म्हटलं आहे. भारत बायोटेककडून लस घेणाऱ्या व्यक्तीला एक फॅक्ट चेक करणारी डाटा शीट दिली जाईल. त्यामध्ये लस घेतल्यानंतर 7 दिवसांमध्ये दिसून येणारी लक्षण लिहावी लागणार आहेत.
केंद्र सरकारकडून 55 लाख डोसची मागणी
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला केंद्र सरकारनं आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारनं भारत बायोटेकला 55 लाख कोवॅक्सिन लसीचे डोस तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचं उद्घाटन करताना कोरोना लस तयार करणाऱ्या दोन्ही भारतीय संस्थांचं अभिनंदन केले होते. लस बनवण्यासाठी साधारणपणे वर्षांहून अधिक काळ लागतो. मात्र, फार थोड्या वेळात मेड इन इंडिया वॅक्सिन बनवण्यात आपण यशस्वी ठरलो, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते.
कोरोना लसींबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोना लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी लसीबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले होते. भारत जगभरात 60 टक्के जीवनरक्षक कोरोना लसींची निर्यात करतो. भारतीय शास्त्रज्ञांनी कठोर परिक्षणातून कोरोना वॅक्सिन तयार केले आहे. देशवासियांनी कोरोना लसीबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला कोरोना लसीचे साडे सतरा लाख डोस आवश्यक आहेत. त्यापैकी 9 लाखांहून अधिक डोस उपलब्ध झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे 20 हजार डोस महाराष्ट्राला उपलब्ध झाले होते. महाराष्ट्रातील कोरोना लसीकरण तात्पुरत्या काळासाठी थांबवण्यात आले आहे.

