राजस्थानातील बिकानेरमध्ये घडलेल्या घटनेमुळे भियाराम कुटुंबासह संपूर्ण हिम्मतासर गावावर शोककळा पसरली आहे.
जयपूर : लपाछपी खेळताना धान्याच्या टाकीत लपून बसलेल्या पाच चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानात घडली आहे. यामध्ये चौघा सख्ख्या बहीण-भावंडाचाही समावेश आहे. श्वास गुदमरल्याने चिमुकल्यांचा करुण अंत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राजस्थानातील बिकानेरमध्ये घडलेल्या घटनेमुळे भियाराम कुटुंबासह संपूर्ण हिम्मतासर गावावर शोककळा पसरली आहे. पाचही मुलांचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होईल. पाचही मुलं आठ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत.
टाकीचं झाकण अचानक बंद
या घटनेच्या वेळी पाचही भावंडं घरातच लपाछपी खेळत होते. खेळताना ते धान्य साठवण्याच्या टाकीत शिरले. त्यावेळी टाकीचं झाकण अचानक बंद झाल्याची शक्यता आहे. श्वास कोंडल्यामुळे मुलांना प्राण गमवावे लागले असावेत.
मुलांच्या आईने दुपारी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. घरात शोधाशोध करुनही चिमुकले कुठेच सापडले नाहीत. धान्याच्या टाकीचं झाकण उघडून पाहिलं असता आई हादरुन गेली. कारण पाचही मुलं आत निपचित पडली होती. ते पाहून आईने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
आठ वर्षांखालील पाच चिमुरडे
जवळपासच्या व्यक्ती घटनास्थळी जमा झाल्या आणि त्यांनी चिमुकल्यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत पाचही मुलांनी अखेरचा श्वास घेतला होता. भीयाराम यांची 8 वर्षांची मुलगी पूनम उर्फ टिंकू, सात वर्षांची रविना, पाच वर्षांची राधा आणि चार वर्षांचा मुलगा सेवाराम यांचा समावेश आहे. तर पाचवी चिमुकली ही भीयाराम यांची भाची माली होती.
त्यांचा आवाज धान्याच्या टाकीतच घुमला
घटनेच्या वेळी भीयाराम आणि त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील सर्वजण शेतात काम करत होते. घरात पाच मुलं लपाछपी खेळत होते. मुलं लोखंडाच्या टाकीत गेले, ज्याची उंची पाच फूट, तर रुंदी तीन फूट होती. झाकण बंद झाल्यानंतर चिमुकल्यांनी ते उघडण्याचा प्रयत्नही केला असावा. मात्र ते आतून उघडलंही नाही, किंवा त्यांचा आवाज ऐकणारं घरात कोणी उपस्थितही नव्हतं.
या घटनेमुळे भीयाारम यांचं हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालंय. ज्या घरात चार-चार चिमुकल्यांचे आवाज नांदायचे, तिथे स्मशानशांतता पसरली आहे. पोस्ट मार्टम अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.

