एप्रिल महिन्यात ऑफलाईन परीक्षेला बसणाऱ्या दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण करावे, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.
नवी दिल्ली: एप्रिल महिन्यात ऑफलाईन परीक्षेला बसणाऱ्या दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण करावे, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे. लोकसभेच्या शून्य प्रहरात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा मुद्दा उपस्थित करून याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांना तातडीने आदेश द्यावेत, अशीही विनंती शेवाळे यांनी केली.
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर घेण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्रात घेण्यात आला. यंदा राज्यातून 10 वी साठी 13 लाख तर 12 वी साठी 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.याशिवाय आयसीएसइ आणि आयएससी परिक्षेसाठीही अनुक्रमे 12 हजार आणि 23 हजार विदयार्थी बसणार आहेत.तसेच सीबीएससीच्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षेला उपस्थित राहता येणार नाही, त्यांना 15 दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पालकांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत, परीक्षेला बसणाऱ्या सर्व विदयार्थ्यांना कोविड लस देण्यात आली तर हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक निर्धास्त होऊन परीक्षेला सामोरे जातील. तसेच परीक्षेच्या वेळी उपस्थित राहणारे शिक्षक, कर्मचारी या सगळ्यांचे लसीकरण करण्याची गरज असून ही प्रक्रिया तातडीने सुरू करून परीक्षा सुरू होण्याच्या आत पूर्ण करायला हवी, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली.
सर्वाधिक रुग्णांची नोंद
राज्यात काल 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 22 लाख 62 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 53 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
मुंबईतील आकडा वाढतोय
मुंबईतील कालचा कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत आज दिवसभरात 5 हजार 185 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 88 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरातील मृतांची संख्या 6 आहे. त्यातील काहीजणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा दर 84 दिवसांवर आला आहे.
‘त्या’ यादीत राज्यातील नऊ शहरे
देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित पहिल्या 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे. तर एक शहर कर्नाटक राज्यातील आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

