राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्याच्या अनेक भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
जालना: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्याच्या अनेक भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जालन्यातही लॉकडाऊनच्या चर्चांनी जोर धरला असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मोठं विधान केलं आहे. जालना जिल्ह्यात सद्यस्थितीत कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नसून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे.
होळी साजरी करताना खबरदारी घ्या
प्रसारमाध्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी हे आवाहन केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी सण साजरा करत असताना प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यावी. होळीच्या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करू नये. कोरोनापासून स्वत: सुरक्षित राहून इतरांनाही सुरक्षित करण्याच्यादृष्टीने कोरोनासंदर्भात प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सूचना तसेच निर्बधांचे तंतोतंत पालन करा, असं आवाहन बिनवडे यांनी केलं आहे.
आरोग्यमंत्र्यांबरोबर उद्या चर्चा
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता याबाबत विचारविनिमय सुरू असून जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत याबाबत उद्या शनिवारी चर्चा करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र, मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराच्या नियमांचं काटेकोर पालन करावे, असं आवाहनही त्यांनी केलं.
काल 337 जणांना कोरोना
दरम्यान, काल 24 तासात जालन्यात 337 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे जालन्यातील रुग्णांची संख्या 20859 वर गेली आहे. सुदैवाने काल जिल्ह्यात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 401 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात काल 35952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवीन 20444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 22,83, 037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,62,685 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे.

