हत्या, चकमक, जाळपोळीचे आरोप; 16 लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी पोलिसांच्या कचाट्यात

0 झुंजार झेप न्युज

खून, चकमक तसेच जाळपोळीसारखे गंभीर आरोप असलेल्या तसेच 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या नक्षलवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

गडचिरोली : खून, चकमक तसेच जाळपोळीसारखे गंभीर आरोप असलेल्या तसेच 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या नक्षलवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. मागील आठवड्यात खोब्रामेंढा येथे झालेल्या सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला होता. याच चकमकीत हा नक्षलवादी जखमी झाला होता. पकडण्यात आलेल्या या नक्षलवाद्याचे नाव किशोर कावडो असे आहे.

नक्षलवाद्याची जखमी अवस्थेत वणवण भटकंती

मागील आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रामेंढा चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले होते. या चकमकीत किशोर कावडो नावाचा नक्षलवादी जखमी झाला होता. या नक्षलवाद्याविरोधात खून, चकमक, जाळपोळे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याला पकडण्यासाठी तब्बल 16 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मागील आठवड्यात झालेल्या चकमकीत जखमी झाल्यामुळे त्याला सोडून इतर नक्षलवाद्यांनी नंतर पळ काढला होता. त्यानंतर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी हा नक्षलवादी भटकत होता. याची गुप्त माहिती मिळताच कटेजरी गावातून नक्षल समर्थक असलेल्या एका नक्षलवाद्याच्या घरातून या जहाल नक्षलवाद्यांला अटक करण्यात आलीये.

नक्षलवाद्याच्या पायाला गँगरीन

चकमकीत गंभीर जखमी झाल्यांमुळे या नक्षलवाद्याच्या पायाला गँगरीन झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्याचे ठरवले. त्याच्यावर गडचिरोली येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. पायाला गोळी लागल्यामुळे त्याच्या पायाला गँगरीन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याच्यावर इतर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, तब्बल 16 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला पकडण्यात यश आल्यामुळे गडचिरोली पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे सांगितले जात आहे. या नक्षलवाद्याकडून नक्षली चळवळीचे काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.