अनेक रुग्णालयातील कोविड सेंटरमध्येही गरजेपेक्षा जास्त रुग्ण दाखल झालेले आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरही मोठा ताण येतोय.
नागपूरः राज्यात कोरोनानं मोठ्या प्रमाणात हातपाय पसरलेले असून, रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्याही वाढत आहे. अनेक रुग्णालयांच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. तर अनेक रुग्णालयातील कोविड सेंटरमध्येही गरजेपेक्षा जास्त रुग्ण दाखल झालेले आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरही मोठा ताण येतोय.
डॉक्टर आणि नर्सेसवर खूपच मानसिक दडपण
नागपूर मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात रुग्णांना भरती करण्यात आलंय. त्यामुळे डॉक्टर आणि नर्सेसवर खूपच मानसिक दडपण येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपूर मेडिकल कॉलेजच्या निवासी डॅाक्टरांनी धरणे आंदोलन केलंय. मेडिकल कॉलेजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आलाय. मेडिकल रुग्णालयाचे 40 निवासी डॉक्टर धरणे आंदोलनावर बसलेत. डॉक्टरांची अडचण प्रशासनाला कळावी म्हणून हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
नॉन कोविड पेशंटचीही मोठ्या प्रमाणात अडचण
विशेष म्हणजे कोरोनाचे रुग्ण मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यानं नॉन कोविड पेशंटचीही अडचण होत आहे. डॉक्टरांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ते पुन्हा एकदा धरणे आंदोलन करणार आहेत. मनुष्यबळ वाढवावं, बेड्सची संख्या वाढवावी, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. ज्यांची ड्युटी कोविड वॉर्डात आहे, ते या धरणे आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. तसेच ज्यांची ड्युटी संपलेली आहे, ते या धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आरोग्य सेवेवर याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. प्रशासनाच्या ही बाब लक्षात यावी, म्हणून हे डॉक्टर धरणे आंदोलनावर बसलेले आहेत.

