भारत देशात 140 कोटी लोकसंख्या असून सध्या 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण अजुन पुर्ण झाले नाही.
सातारा: देशात अद्याप 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले नसताना केंद्र सरकारने 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. अगोदरच लसींचा तुटवडा असताना आता 18 वर्षांवरील नागरिकांना लस कुठून देणार, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
ते बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. भारत देशात 140 कोटी लोकसंख्या असून सध्या 45 वयोगटाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण अजुन पुर्ण झाले नसुन तरीदेखील 18 वर्षावरील सर्वांना लसीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तेवढी लस भारतात आहे का, याचचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अन्यथा 1 मे नंतर गर्दी झाली तर हे दुर्दैव म्हणावे लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
‘केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत’
देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांच्या 20 ऑक्टोबर 2020 ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते. पाच महिन्यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत extremely comfortable आहे. मागील दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही, असे सचिवांनी म्हटले होते.
ऑक्टोबर 2020 मध्येच 1 लाख टन वैद्यकीय ऑक्सीजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे असेदेखील सांगितले होते. अशा या फाजील आत्मविश्वासामुळे आज देश गंभीर संकटात असून मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

