राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाढत्या कोरोना संसर्गावरून राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
नागपूर: राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाढत्या कोरोना संसर्गावरून राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचा रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्यानेच नागपूरमध्ये सुपर स्प्रेडरकडून कोरोनाचा संसर्ग फैलावला जात असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाची विदारक परिस्थिती आहे. ग्रामीण भागात पाच ते सात दिवसानंतर आरटीपीसीआर चाचण्यांचा रिपोर्ट येत आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना झालाच नाही, अशा अर्विभावात संशयित रुग्ण फिरत असतात. त्यामुळे त्यांच्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण होत आहे. परिणामी नागपूर ग्रामीणमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. केवळ नागपूरच्या ग्रामीण भागातच नव्हे तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातही आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल सहा दिवसांनी येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
14 महिन्यात शून्य नियोजन
गेल्या 14 महिन्यांपासून राज्यात कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचं संकट महाभयंकर असल्याचं राज्याचे मंत्री वारंवार सांगत असतात. परंतु, या 14 महिन्यात नागपूरच्या ग्रामीण भागात साधी आरटीपीसीआर चाचणीची सोय करण्यात आलेली नाही. तसेच शहरातून रिपोर्ट येईपर्यंत रुग्णांवर उपचार होत नाही. सुपर स्प्रेडरचं टेस्टिंग होत नाही, प्रशासन करत असलेले सर्व दावे फोल ठरत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
नागपूरमध्ये ऑक्सिजन बेड नाही
नागपूरच्या ग्रामीण भागात एकही ऑक्सिजन बेड नाही. नागपूरचे कलेक्टर मात्र पैसे घेऊन बसलेत. ग्रामीण भागात पैसा खर्च केला जात नाही. आरोग्य सुविधा वाढवल्या जात नाहीत. काटोल, नरखेडमधील रुग्णांना उपचारासाठी अमरावतीला जावं लागत आहे. आघाडी सरकारने गेल्या अकरा महिन्यात आरोग्याच्या दृष्टीने शून्य नियोजन केलं आहे. आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यानेच ही वेळ आली आहे, असं सांगतानाच जिल्ह्यात रेमडेसवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पवार-पाटलांवर गुन्हे दाखल करा
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पंढरपूरमध्ये मोठमोठ्या सभा घेत आहेत. या सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाढत आहेत. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली. आरोग्य व्यवस्थेबाबत सरकार जागृत झाले नाही तर 10 हजार लोकांचा मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला.

