देशभरात आजपासून 'लस उत्सव'; अधिकाधिक नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य

0 झुंजार झेप न्युज

देशात आतापर्यंत 85 दिवसांमध्ये 10 कोटी लसी नागरिकांना देण्यात आल्या आहेत. भारत हा जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश ठरला आहे.

Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर आज (रविवार)पासून 14 एप्रिलपर्यंत देशभरात 'लस उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांपर्यंत लस पोहोचवणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. 'लस उत्सव' या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नेतेमंडळींनीही पुढाकार घेत नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबतची जनजागृती करण्यासाठी योगदान दिलं आहे. 

85 दिवसांत दिल्या गेल्या 10 कोटी लसी 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी दिलेल्या माहितीनुसार भारतात मागील 85 दिवसांमध्ये 10 कोटी लसी देण्यात आल्या आहेत. यामुळं जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहिम राबवणारा भारत हा पहिलाच देश ठरत आहे. चीनला 10 कोटी लसी देण्यासाठी 102 दिवासांचा कालावधी लागला होता. 

लस वाया जाऊ देऊ नका, पंतप्रधानांचं आवाहन 

लस कोणत्याही प्रकारे वाया जाऊ दिली जाणार नाही, यावर आपण लक्ष दिलं पाहिजे यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही दिसले, 'अनेकदा यामुळं परिस्थिती आणि प्रसंग बदलण्यास मदत होते. महात्मा जोतिबा फुले यांची जयंती 11 एप्रिलला आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे. आपण लस उत्सवाचं आयोजन करु शकतोय का? तशी वातावरणनिर्मिती करु शकतोय का? एका खास मोहिमेअंतर्गत आपण अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत ही लस पोहोचवली पाहिजे. लस कशा पद्धतीनं वाया जाणार नाही, यावर लक्ष दिलं पाहिजे. 'लस उत्सव' दरम्यानच्या चार दिवसांत लस वाया गेली नाही, तर आपली लसीकरण क्षमताही वाढलेली असेल.'

दरम्यान, एकिकडे लस उत्सवाची हाक पंतप्रधानांनी दिलेली असतानाच महाराष्ट्रात मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच लसींच्या पुरवठ्यावरुन आता वेगळंच राजकारणही तापू लागलं आहे. त्यामुळं राजकारण बाजूला सारत नेतेमंडळी, सत्ताधारी आणि विरोधकांनी नागरिकांच्या हितासाठी एकत्र येण्याचाच सूर जनसामान्यांतून आळवला जात आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.