नवाब मलिक यांना बदलून त्यांच्या जागी कार्यक्षम पालकमंत्री द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.
परभणी : परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना बदलून त्यांच्या जागी कार्यक्षम पालकमंत्री द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. त्याबाबतचं पत्र प्रहार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
नवाब मलिक हे राज्य सरकारमधील एक मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे परभणी जिल्हा पालकमंत्री पदासह इतरही अनेक मोठ्या जबाबदार्या आहेत. यामुळे ते परभणी जिल्ह्याला वेळ देण्यास कमी पडत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्याला पालकमंत्री नवाब मलिक यांच्याऐवजी दुसरा सक्षम, पूर्णवेळ देणारा कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मागील वर्षी आणि यंदाचं कोरोना संकट असो एक जबाबदार पालकमंत्री म्हणून नवाब मलिक यांनी परभणी जिल्ह्याकडे लक्ष देणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही, असा आरोप प्रहारचे शिवलिंग बोधने यांनी केला.
चालू वर्षी वाढत्या कोव्हिड संक्रमण काळातदेखील त्यांनी 3 महिन्यानंतर पहिला जिल्हा दौरा केला आहे. 15 ऑगष्ट, 26 जानेवारी 1 मे आणि 17 सप्टेंबर या शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमा व्यतिरिक्त त्यांनी परभणी दौरा कदाचितच केला असेल. पालकमंत्री जेव्हा जेव्हा परभणीत येतात, तेव्हा अधिकार्यांच्या बैठका घेऊन केवळ आश्वासन देत घोषणा करून निघून जातात. त्यांनी जिल्ह्याला दिलेली आश्वासने प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर कुठलेच काम झालेले दिसत नाही, असाही आरोप शिवलिंग बोधने यांचा आहे.
एकीकडे जिल्ह्यातील जनता कोव्हिड महामारीमुळे त्रस्त असून, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि बेडसचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत मुंबईला बसून परभणीचा कारभार बघणे शक्यच नाही. हे परभणी जिल्ह्यातील जनतेच्या जीवाशी खेळणे आहे. याकरिता मुख्यमंत्र्यांनी कोव्हिड महामारीचा परभणी जिल्ह्यातील वाढता आलेख पाहता परभणी जिल्हयाला पूर्णवेळ आणि कार्यक्षम पालकमंत्री द्यावा जेणे करुन, प्रशासकीय पातळीवर निर्णय क्षमता मजबूत होऊन परभणी जिल्हयाला न्याय मिळेल असेही या पत्रात म्हटले आहे. पत्राची एक प्रत प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनाही मेलद्वारे पाठविण्यात आली आहे.

