हप्ते गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे.
सोलापूर : गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा धक्कादायक आरोप सोलापुरातील व्यापाऱ्याने केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी पैसे मागितल्याचा आरोप सराफ व्यावसायिक अमृतराव गुगळे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सोन्याचं दुकान सुरु ठेवल्याने गुन्हा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. तरीपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने चांगमल ज्वेलर्स हे आपलं सोन्याचं दुकान सुरु ठेवलं होतं. राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांचं दुकान सील केलं.
गृहमंत्र्यांच्या नावे बार्शी पोलिसांनी पैसे मागितल्याचा आरोप
दरम्यान, बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी आपल्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी अमृतराव गुगळे यांनी केला आहे. हे सर्व हप्ते गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे.
बार्शी पोलिसांनी सराफ व्यावसायिकाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अमृता अमृतराव गुगळे यांनी सराफ दुकान उघडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतराव गुगळे यांचे सराफ दुकान चालू असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केली, असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं.
पूर्वग्रहातून सराफाने आरोप केल्याचा पोलिसांचा दावा
अमृतराव गुगळे यांच्या दोन पुतण्यांविरुद्ध पंधरा दिवसापूर्वी जबरदस्ती जमीन हडपणे आणि सावकारी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पूर्वग्रहदूषित होऊन हे खोटे आरोप केल्याचा दावा पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी केला आहे. त्यांच्यावर चारित्र्यहनन केल्याबद्दल लवकरच कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
माजी गृहमंत्र्यांवर आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. त्यानंतर देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश हायकोर्टाने दिले. त्यामुळे अनिल देशमुख पायउतार झाले, तर दिलीप वळसे पाटील यांच्या खाद्यांवर गृहमंत्रिपदाची धुरा देण्यात आली आहे.

