देवेंद्र फडणवीसांना अटक करा; रुपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

0 झुंजार झेप न्युज

आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुणे: रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा केल्याचा संशय असलेल्या ब्रूक फार्माच्या  मालकाच्या पोलीस चौकशीवर आक्षेप घेणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिला, असा आरोप चाकणकर यांनी केला.

त्या सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. त्यामुळे आता गृहमंत्री यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचे कारस्थान आखलंय?’

देशभरातील 16 निर्यातदारांकडे 20 लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स पडून आहेत. पण ही इंजेक्शन्स महाराष्ट्राला विकू नयेत, अन्यथा तुमचे परवाने रद्द करू, अशी धमकी केंद्र सरकारकडून कंपन्यांना देण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजप (BJP) विरोधी पक्षात असूनही ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर (remdesivir injection) देऊ शकते, हे सिद्ध करण्यासाठीच या कंपन्यांवर दबाव आणला जात आहे. ही सगळी परिस्थिती पाहता भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचे कारस्थान आखले आहे का, अशी शंका येत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

‘महाराष्ट्रातील भाजप नेते फार्मा कंपनीची वकिली का करतात?’

महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिव्हीरचा साठा विकत घेतात. त्या कंपन्या हा साठा परस्पर उपलब्ध करुन देतात हा अपराधच आहे. पण ही साठेबाजी व काळाबाजारी कृत्ये पोलिसांनी उघड करताच भाजपचे लोक कढईतल्या गरम वड्यासारखे उकळून फुटू लागले. भाजपने हा रेमडेसिव्हीरचा साठा म्हणे विकत घेतला. मग हा साठा राज्य सरकारला का मिळू नये?

केंद्राचा चाप लागल्याशिवाय फार्मा कंपन्या अपराध करायला प्रवृत्त होणार नाहीत. विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या एका फार्मा कंपनीच्या मालकाच्या सुटकेसाठी मध्यरात्रीच पोलीस ठाण्यावर धडकतात यास काय म्हणावे? अशावेळी विरोधी पक्षनेते महाराष्ट्राची वकिली करण्याचे सोडून महाराष्ट्राला औषधे नाकारणाऱ्या फार्मा कंपनीची वकिली करत आहेत. हे असे महाराष्ट्रात यापूर्वी कधीही घडले नव्हते, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.