अहमदनगरमधील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी कोरोनाबाधित वृद्धाच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
अहमदनगर : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मृत कोरोनाबाधित आजोबांना मुखाग्नी दिला. एक मुलगा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट तर दुसऱ्याला तात्काळ येणे शक्य नसल्याने प्रशासनानेकडून वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अहमदनगरमधील या घटनेमुळे समाजमन हेलावले आहे.
78 वर्षीय वृद्धाचे कोरोनामुळे निधन
अहमदनगरमधील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी कोरोनाबाधित वृद्धाच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. पारनेर तालुक्यातील किन्ही येथील गोमा यशवंत खोडदे या 78 वर्षीय वृद्धाचे कोरोनामुळे निधन झाले. मात्र एक मुलगा हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, तर दुसऱ्या मुलाला तात्काळ येणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रशासनानेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
तहसीलदार ज्योती देवरे स्मशानभूमीत
कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह अधिक काळ ठेवणे धोकादायक असल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर कोणताही विचार न करता त्यांनी थेट स्मशानभूमीत जाऊन अंत्यसंस्कार केले. ज्योती देवरेंच्या स्तुत्य पावलाचे कौतुक केले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता
अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दररोज साडेतीन हजाराच्या आसपास नवे कोरोना बधित रुग्ण सापडत असल्याने आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सांगलीत वृद्धेवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंत्यसंस्कार
वृद्ध मातेच्या अंत्यसंस्काराकडे पोटच्या मुलांनी पाठ फिरवली, मात्र सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ही मन हेलावणारी घटना घडली. मुलांच्या कृतघ्नतेचा धक्का बसलेला वृद्धेचा पतीही यावेळी माणुसकीच्या दर्शनाने गहिवरला. वयोवृद्ध महिलेचं निधन झाल्याने तिच्या नातेवाईक आणि मुलांना फोन करण्यात आला. त्यावर “आम्हाला काही सांगू नका, तुमचं तुम्ही काय करायचं ते ठरवा” असं कोरडं उत्तर आलं. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी स्वखर्चातून तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

