हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर घडत असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
अकोला : अकोला जिल्ह्यातील सरपंच निवडीच्या जल्लोषपूर्ण मिरवणुकीत कोरोना नियमांचा फज्जा उडाला आहे. अकोला जिल्हातल्या पातुर तालुक्यातील आलेगाव येथील ग्रामपंचायतीत सरपंचाची निवड करण्यात आली. या निवडीनंतर गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना निर्बंधाचे कोणतेही पालन करण्यात आले नाही. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर घडत असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
नवनियुक्त सरपंच समर्थकांकडून जंगी मिरवणूक
अकोला जिल्ह्यात काल (8 एप्रिल) 16 रिक्त असलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक पार पडली. यात आलेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर गुरुवारी सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक पार पडल्यानंतर नवनियुक्त सरपंच आणि समर्थकांनी गावातून अत्यंत जंगी भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीतील गर्दीत लोकांनी कोणीही मास्क लावलेले नव्हते.
यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आलेलं नाही. यावेळी अनेक नियम पायदळी तुडवण्यात आले. तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यात आला नाही. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोर ही सर्व मिरवणूक काढण्यात आली. मात्र त्यांनी कशालीही विरोध केला नाही. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून जल्लोष साजरा करा अशी साधी तंबी सुद्धा कुणाला दिली नाही.
पोलिसांकडूनही कोणताही आक्षेप नाही
त्यामुळे पोलीस काहीही बोलत नसल्याने त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, असे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अनेकजण पोलिसांच्या समोरच मास्क न घालता वावरत होते. कोरोना नियमांची पालन न करता जंगी जल्लोष साजरा करण्यात आला.
आता या घटनेतून गावात कोरोनाचा प्रसार झाला तर त्याला जबाबदार कोण? या मिरवणुकीत कोणीही कोरोनाबाधित झाल्यास नवनियुक्त सरपंच जबाबदार राहणार की त्यांचे कार्यकर्ते जबाबदारी घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच या सर्व प्रकाराला अप्रत्यक्ष समर्थन देणारे पोलीस जबाबदार राहणार का ..? असेही विचारले जात आहे. आता जिल्हा प्रशासन या सगळ्या प्रकारावर काय कारवाई करते. याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

