मधल्या काळात ट्रॅक चुकला, भाजपला टोले, कल्याणराव काळे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत

0 झुंजार झेप न्युज

इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार" असं कल्याणराव काळे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. 

पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. अवघ्या दोन वर्षांतच काळेंनी भाजपला रामराम ठोकला. त्यावरुन “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आहे.

“मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला”

“विठ्ठल परिवार एकत्र असला पाहिजे. भविष्यात परिवाराची ताकद विरोधकांना दाखवली पाहिजे. परिवार एकत्र आला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता. आता जिल्हा सगळा राष्ट्रवादीमय करणार. पवार साहेबांची ताकद कायम स्वरुपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार” असं कल्याणराव काळे पक्षप्रवेशानंतर म्हणाले.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काही दिवसांपूर्वी सरकोली येथे गेले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली होती. तेव्हापासूनच कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

काळेंसह पवारांकडूनही संकेत

“आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करु” असं कल्याणराव काळे त्यावेळीच म्हणाले होते. “सगळ्यांनी एकत्र निर्णय घेऊन निर्णय घेऊ. कल्याणराव, सगळ्यांना म्हटलंय हं.. सगळ्यांना बरोबरीत घेऊन निर्णय घेऊ. सगळे येतात, एकत्र चर्चा करतात, त्याचं काय वेगळं होणार आहे का?” असं पवारही त्यावर मिश्किलपणे म्हणाले होते.

विधानसभेच्या तोंडावर भाजपात प्रवेश

कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. मात्र 2019 मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

कोण आहेत कल्याण काळे?

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले

माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार

राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष

सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवले होते

राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.