कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे.
कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये तर खुर्चीवर बसवून रुग्णांना ऑक्सिजन दिला जातोय. या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
आयुक्तांच्या डॉक्टरांना सूचना
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णलयात ऑक्सीजन कमी पडतो. खाजगी रुग्णालयांनी टाळता येण्यासारख्या रुटीन सजर्री टाळून पुढे ढकलल्यास त्या सजर्रीसाठी लागणारा ऑक्सीजन कोविड रुग्णांकरीता वापता येऊ शकतो अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खाजगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांना केली आहे.
कल्याणमध्ये दररोज किती ऑक्सिजन लागतो?
राज्याच्या टास्क फोर्सने ज्या कोरोना रोखण्यासाठी ज्या काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत त्यासंदर्भात आज महापालिका आयुक्तांनी खाजगी कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांशी वेबीनॉरद्वारे संवाद साधला. हा संवाद साधल्यानंतर सूचना केल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना 45 मेट्रीक टन ऑक्सिजन लागतो. महापालिकेची रुग्णालये धरुन खाजगी कोविड रुग्णालयांना 128 मेट्रीक टन ऑक्सीजनची गरज आहे. अनेक खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजनचा पुरवठा करणारे पुरवठादार हे लहान स्वरुपाचे आहे. त्यांना मोठ्या स्वरुपाच्या पुरवठादारांकडून ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा यासाठी महापालिका प्रसासन प्रयत्नशील आहे, असं आयुक्तांनी सांगितलं.
‘ऑक्सीजन कमी पडू दिला जाणार नाही’
ऑक्सीजन कमी पडू दिला जाणार नाही यासाठी महापालिकेकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन रुग्णांसाठी लाईफ सेव्हर नाही. हे इंजेक्शन रुग्णाला दोन ते नऊ या दिवसात दिले गेले पाहिजे. काही डॉक्टर हे इंजेक्शन दहा दिवस देत आहेत. परिणामी औषधेही रुग्णाचा जीव वाचवू शकतात. त्याचा वापर खाजगी कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी करण्याची गरज आहे, असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं.
‘रुग्णांनी ताप अंगावर काढू नये’
काही रुग्ण चार पाच दिवस ताप अंगावरु काढून मग कोरोना टेस्ट करतात. रुग्णांनी असे न करता टेस्ट केली पाहिजे. रुग्णालयांऐवजी घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी दर चार तासांनी ताप किती आहे हे तपासले पाहिजे. सहा मिनिटे चालण्याची टेस्ट केली पाहिजे. त्याचबरोबर प्लाझ्मा हा दोन ते चार दिवसात दिला गेल्यास रुग्णाला उपयुक्त ठरु शकतो. मात्र अनेक रुग्ण हे चार दिवसांनी रुग्णालयात येतात. याकडे टास्क फोर्सने लक्ष वेधले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

