आठवडाभरात महाराष्ट्रातील कोरोना लसींचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
कोल्हापूर: महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कोरोना लसींच्या तुटवड्यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य असा संघर्ष तापायला सुरुवात झाली आहे. या वादात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. येत्या आठवडाभरात महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा वाढवून मिळाला नाही तर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोना लसी घेऊन जाणारी एकही गाडी बाहेर पडून देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
आपण यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि गृहमंत्र्यांना पत्रही लिहले आहे. आठवडाभरात महाराष्ट्रातील कोरोना लसींचा पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते राजू शेट्टी यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पुण्याला थेट लसींचा पुरवठा, हा तर महाराष्ट्रातील नागरिकांवर अन्याय
केंद्र सरकारने नुकताच पुणे शहराला दीड लाख कोरोना लसींचा साठा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला लसींचा थेट पुरवठा करणे हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे केंद्र सरकारचीच नाचक्की होईल. केंद्राच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. राज्य सरकारचं ऐकलं जात नाही, असा संदेश जाईल, असे राऊत यांनी म्हटले.
फक्त पुण्यातील भाजपच्या महापौरांसाठी केंद्र सरकार हा वेगळा नियम लावत असेल तर हा उर्वरित महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. लोक त्यांना आपला नेता मानतात. त्यामुळे आमचं किंवा तुमचं सरकार आहे हे बघून निर्णय घेऊ नका, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

