65 साखर कारखान्यांची चौकशी करा :चंद्रकांत पाटील
पिंपरी चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील 65 साखर कारखान्यांच्या विक्रीची यादी जाहीर केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या यादीवरून थेट अजित पवार यांना ललकारले आहे. जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या 64 कारखान्यांची चौकशी करू नका, अशी आमची भूमिका कधीच नव्हती. उलट अजितदादांनी जाहीर केलेल्या सर्वच्या सर्व 65 साखर कारखान्यांची चौकशी करा अशीच आमची मागणी आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील हे पिंपरी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे आहे व त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी करत आहे. ऊर्वरित साखर कारखान्यांचे प्रकरणही मनी लाँडरिंगचे असेल तर त्याचीही चौकशी करावी. उपलब्ध माहितीनुसार इतर कारखान्यांची विक्री कमी किंमतीला झाल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करताना त्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या गैरव्यवहाराला मौन संमती देणाऱ्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची आणि मदत करणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
राजस्थान सरकारची मदत घ्यावी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार केली आहे, त्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केवळ तक्रार करण्यापेक्षा राजस्थानमधील सरकारच्या मदतीने धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत, असा चिमटा त्यांनी काढला.
मनसेसोबतच्या युतीची शक्यता नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपाची युती होईल का? असे विचारले असता, संपूर्ण देश एक आहे, अशी भाजपाची भूमिका असून मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही. त्यामुळे मनसेसोबत भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संभाजी ब्रिगेडशी युती नाहीच
संभाजी ब्रिगेडसोबत भाजपाची युती होण्याचा काहीही प्रस्ताव आलेला नाही. त्याबाबत आपण केवळ वर्तमानपत्रातून वाचले. असा प्रस्ताव आला तरीही भाजपाची संभाजी ब्रिगेडशी युती होण्याची शक्यता आपल्याला वाटत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
