जास्तीत जास्त नागरिकांनी मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करुन घ्यावे - जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

0 झुंजार झेप न्युज

• “मिशन कवचकुंडल” मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यास 25 ऑक्टोबरपासुन सुरुवात

• मोहिमेदरम्यान किमान अडीच लाख लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्याचे नियोजन करा

जालना,दि.21:“मिशन कवचकुंडल” या मोहिमेचा तिसरा टप्पा जिल्ह्यात 25 ते 30 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत असुन सहा दिवसांच्या या मोहिमेच्या कालावधीत जिल्ह्यात किमान अडीच लाख लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देत या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोव्हीड लसीकरणासाठीच्या कृतीदल समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते. 

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी श्रीमती संगिता लोंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, प्र. उपपोलीस अधीक्षक एस.एम. व्यास यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महिला व बालविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, लसीकरणाचा टक्का वाढावा यादृष्टीने मिशन कवचकुंडल या मोहिमेचा तिसरा टप्पा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान सहा दिवसांमध्ये किमान अडीच लाख लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असुन या मोहिमेचे आरोग्य विभागाने काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सुचना करत ज्या गावांमध्ये लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे अशा गावातील नागरिकांना लसीकरणाची माहिती दोन दिवस आधी उपलब्ध करुन द्या. गावनिहाय झालेल्या लसीकरणाची माहिती एकत्रित करत जी गावे लसीकरणामध्ये मागे आहेत अशा गावांमध्ये प्राधान्याने लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावीत. गावामध्ये लस न घेतलेल्या नागरिकांची माहिती गोळा करत या नागरिकांना लसीकरण केंद्रामध्ये जाऊन लस घेण्याबाबत प्रवृत्त करत लसीकरणाबाबत गावांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी दिले. 

25 ते 30 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी लसीच्या मात्रेची कमतरता भासणार नाही] यादृष्टीने मुबलक प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करुन घेण्यात यावेत. तसेच लसीकरण हे सकाळी 8-00 ते रात्री. 8-00 वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याने या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी वेळेत उपस्थित राहतील याची काळजी घेत सर्व विभागांनी परस्परांमध्ये समन्वय राखत जिल्ह्यात अधिकाधिक लसीकरण होईल, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. 

यावेळी डॉ. विवेक खतगावकर यांनी मोहिमेच्या काळात 170 ते 180 ठिकाणी लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असुन प्रत्येक केंद्रावर किमान 300 लाभार्थ्यांना डोस देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.