‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत लसीकरणाची मोहिम प्रभावीपणे राबवा -जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

0 झुंजार झेप न्युज

• जिल्ह्याचे लसीकरणाचे उद्दिष्ट सक्रीयपणे पूर्ण करा 

• नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लसीकरण करण्याचे आवाहन

• ‘कोविड ॲप्रोप्रियेट बिएव्हियर’ चे काटेकोर पालन करा

वर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जवळपास दिडवर्षाने जिल्ह्यातील शाळा, कॉलेजसह प्रार्थनास्थळे उघडण्यात आली आहे. सण, उत्सवाच्या मंगलमय वातावरणात बाजारपेठा सुध्दा खुल्या करण्यात आल्या आहेत. पंरतू, अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवून प्रत्येकाचे लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज येथे दिले. उत्सावाच्या धामधूमीत नागरिकांनी गर्दी न करता ‘कोविड ॲप्रोप्रियेट बिएव्हियर’ चे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड टास्क फोर्सच्या आयोजित बैठकीत ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेंतर्गत करावयाच्या कामकाजांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वेदपाठक, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

 श्रीमती देशभ्रतार म्हणाल्या की, कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ नये यासाठी आरोग्यी विभागाव्दारे मिशन कवच कुंडल मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत ग्रामस्तरावर प्रत्येक गावातील अठरा वर्षावरील व्यक्तीचे लसीकरण करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हयात 60 वर्षावरील जेष्ठांचे शंभरटक्के लसीकरण झाले आहे. 45 ते 60 वर्षाच्या वयोगटातील व्यक्तींचे पहिला डोस 88 टक्के तर दुसरा डोस 46 टक्के व्यक्तींचा पूर्ण झाला आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण पहिला डोस 56 टक्के तर दुसरा डोस 15 टक्क्यापर्यंत पूर्ण झाला आहे. ही लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे व जिल्ह्यातील सर्व व्यक्तींचे दोन्ही डोस देऊन लसीकरण झाले पाहिजे. तरच आपण कोरोनाला हरवू शकतो. जिल्हयात कोविड लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यानुसार आरोग्य विभागाने प्रत्येक लसीकरण केंद्रांवर जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होईल, या उद्देशाने लसीचा पुरवठा वितरीत करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

 प्रत्येकाचे लसीकरण होण्यासाठी तालुकास्तरीय कोविड टास्क फोर्सने सक्रीयपणे काम करणे आवश्यक आहे. टास्क फोर्सने ग्रामस्तरावर लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी पहिला डोस घेतलेल्या प्रपत्र अ यादी व दुसरा डोस घेतलेल्यांची प्रपत्र ब यादी तयार करुन माहिती गोळा करावी. त्यानुसार ज्यांचे दुसरा डोस अपूर्ण असेल अश्या व्यक्तींची गावनिहाय यादी तयार करुन लसीकरण मोहिम त्या त्या गावांत शिबीर घेऊन राबवावी. ज्येष्ठांना लसीकरण केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी. ग्रामस्तरावर गटविकास अधिकारी तसेच नगरपरिषद स्तरावर मुख्याधिकारी यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन लसीकरणाचे लक्षांक पूर्ण करावे. यासाठी नोडल अधिकारीची नियुक्ती करुन दैनंदिन डेटा व्यवस्थित ठेवावा व त्यानुसार उत्तम नियोजन करावे.

या कवच कुंडल अभियान सप्ताह दरम्यान पहिल्या डोजचा कालावधी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने दुसरा डोज देण्यात येणार असून जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केल्या जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बैठकीत दिलीर. गावस्तरीय समिती, तालुकास्तरीय समिती, मोठी गावे, प्रभाग इ. ठिकाणी सत्र आयोजित करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा तसेच दुर्गोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्था यांनी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने लसीकरण पूर्ण करून स्वत:चे व इतरांचे कोविड आजारा पासून संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्रीमती देशभ्रतार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.