जिल्हाधिकारी यांनी जाणल्या निराधार वृद्धांच्या व्यथा उमरी पठार येथील वृद्धाश्रमाला दिली भेट

0 झुंजार झेप न्युज

जिल्हाधिकारी यांनी जाणल्या निराधार वृद्धांच्या व्यथा उमरी पठार येथील वृद्धाश्रमाला दिली भेट

यवतमाळ : कुणी पोटच्या मुलाशी पटत नाही म्हणून घर सोडले, तर मुलांनाच आई- वडील सांभाळणे जड झाले म्हणून मुलांनी आई- वडिलांना वृद्धाश्रमात आणून सोडले,  कुणी निराधार तर कुणाला घरमालकांनी बाहेर काढून दिले, सांभाळायला कुणी नाही म्हणून शेजा-यांनी वृद्धश्रमात आणून ठेवले. अशी प्रत्येकाची वेगळी कथा आणि व्यथाही. उमरी पठार येथील संत श्री दोला महाराज वृद्धाश्रमात अशा निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा तेथील प्रत्येकाशी हितगुज साधत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मायेने जाणून घेतल्या.

शेषराव डोंगरे यांनी वृद्धांच्या सेवेचे व्रत घेऊन ज्येष्ठांचा  सांभाळ करण्यासोबतच  त्यांचे एकटेपण दूर करण्याचे जे काम निस्वार्थी भावनेने आरंभले ते प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गारही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी काढले. 

यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील  नागरिकांशी संवाद साधला. प्रत्त्येकाजवळ आपुलकीने जात वृद्धश्रमात कसे आले याची विचारपूस करतानाच इथे काही कमतरता आहे का याचीही आस्थेने माहिती घेतली. यावेळी अनेकांकडे आधारकार्ड नाही तसेच निराधार योजनेचा लाभ मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी 15 दिवसात याठिकाणी शिबिर आयोजित करून आधार कार्ड काढण्यासंदर्भात  तहसीलदारांना सूचना दिल्यात, तसेच पात्र लाभार्थ्यांना  निराधार योजनेचा लाभ देण्यासही सांगितले.  सोबतच वैद्यकीय तपासणीचे शिबिरही आयोजित करणार असल्याचे सांगितले.

शेषराव डोंगरे यांनी सेवाभावी वृत्तीने चालविलेल्या या वृद्धाश्रमात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  प्रशासनाच्या वतीने शक्य ते सहकार्य  करण्याची हमी जिल्हाधिकारी  त्यांनी दिली. 

2007 च्या ज्येष्ठ नागरिक कायद्याची करणार अंमलबजावणी

ज्येष्ठ नागरिकांना अपत्यांकडून निर्वाह भत्ता देण्याबाबतचा 2007 च्या कायद्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या यासंदर्भातील तक्रारी प्राप्त करून करून घेऊन अशा  अर्जावर उपविभागीय अधिकारी यांच्या कडून आदेश करण्यात येईल.  ही मोहीम महिनाभर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे, याबाबतचा  सर्व उपविभागीय अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत,  असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.