अहमदनगरच्या सरकारी रुग्णालयात आग, 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू
अहमदनगर : अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने कोल्हापूरवरुन अहमदनगरकडे रवाना झाले आहेत.
नगरच्या सरकारी रुग्णालयात आग, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू
राज्यात सगळीकडे दिवाळीचा उत्साह सुरु असताना इकडे नगरमध्ये आज सकाळी साडे दहाच्या सुमारास सरकारी रुग्णालयाला आग लागली. ग्राऊंड फ्लोअरवर अतिदक्षता विभागाला आग लागली. या विभागात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते.
आग लागताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. पण आग मोठी होती. काही वेळातच आगीने संपूर्ण अतिदक्षता विभाग व्यापला. याच विभागातील 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. जवळपास दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं.
मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनाबाधित
रुग्णालयातील ICU विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा कोरोनाविरोधी लढा सुरु होता. मात्र आज आग काळ बनून आली. शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत यातील 10 रुग्णांचा भाजून मृत्यू झाला आहे. सर्व रुग्ण हे कोरोनाबधित होते.
